नवी दिल्ली – राष्ट्रपती भवनातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा अधिकारी सहायक पोलीस आयुक्त दर्जाचा असून त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अन्यही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करून त्यांची तपासणी करण्याचा निर्णय झाला आहे.
मागच्या आठवड्यात राष्ट्रपती भवनात राहणाऱ्या 115 घरातील लोकांनाहीं क्वारंटाईन करण्यात आले होते. त्या रहिवाशांपैकी एका इसमाच्या नातेवाईकाला करोना झाल्याचे लक्षात आल्यानंतर ही उपाययोजना करण्यात आली होती. आज एक वरिष्ठ पोलीस अधिकारीच करोनाग्रस्त आढळून आल्यानंतर आता तेथे अधिक जागरूकपणे उपाययोजना केली जात आहे.
दरम्यान, प्रत्यक्ष राष्ट्रपतींच्या सचिवालयातील कोणालाही याची बाधा झाल्याचे दिसून आलेले नाही.