भोपाळ – मध्य प्रदेशातील एका जेष्ठ भाजप आमदाराचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने इतर आमदारांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मध्य प्रदेशात काल (शुक्रवारी) राज्यसभेच्या तीन जागांसाठीची मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र मतदान प्रक्रियेला काही तास उलटत नाहीत तोवरच या जेष्ठ आमदार व त्यांच्या पत्नीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
दरम्यान, या जेष्ठ आमदाराच्या संपर्कात आलेल्या इतर आमदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून सदर आमदार महोदयांनी पक्षाच्या बैठकीस देखील उपस्थिती लावल्याची माहिती समोर येत आहे. आमदार महोदयांच्या पत्नीस त्रास जाणवू लागल्याने दोघांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र या चाचणीचा अहवाल राज्यसभेची निवडणूक पार पडल्यानंतर काही तासांनी हाती आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब निदर्शनास आली. आता या जेष्ठ आमदाराच्या संपर्कात आलेल्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची मोहीम आरोग्य विभागातर्फे हाती घेण्यात आलीये.
याबाबतची माहिती मिळताच मंदासूरचे भाजप आमदार यशपाल सिंग सिसोदिया हे इतर दोन आमदारांसह कोरोना चाचणी करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पोहोचल्याची बातमी एका वृत्तसंस्थेने दिली आहे. याआधी राज्यात एका काँग्रेस आमदाराला देखील कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते.