पुणे – शहरात शासकीय तसेच खासगी प्रयोगशाळेत करोना चाचण्या केल्या जात आहेत. सोबतच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही करोनावरील चाचण्या करण्यात येणार आहेत. यासाठी “सेंटर फॉर मॉल्यूकुलर डायग्रोस्टिक ऍड रिसर्च सेंटर’ हे संशोधन केंद्र पुणे विद्यापीठातर्फे उभारणीचे काम सुरू आहे. त्यामुळे लवकरच पुणे विद्यापीठातही करोना चाचणी होणार आहे.
कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी ही माहिती दिली. कुलगुरू म्हणाले, “करोनाच्या काळात पुणे विद्यापीठातील 15 प्राध्यापकांची टीम “आयसर’मध्ये तेथील शास्त्रज्ञांसोबत संशोधन करत आहे. पुणे शहरात चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याने विद्यापीठातही करोनासह इतर सर्वच साथीच्या रोगांचे निदान करण्यासाठी प्रयोगशाळा सुरू केली जाणार आहे. त्यास मान्यता मिळाली असून, पुढच्या दीड महिन्यांत दिवसाला 350 करोनाच्या चाचण्या करणे शक्य होणार आहे.
पुणे विद्यापीठात मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रात काम केले जाते, पण येथे व्हायरॉलॉजी या शाखेवर काम केले जात नाही. त्यासाठी खास प्रयोगशाळेची गरज आहे. ही प्रयोगशाळा सुरू झाल्यानंतर त्याच्याशी मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी यासह इतर विभाग त्याच्याशी जोडले जातील. तो पर्यंत “आयसर’मध्ये संशोधन करणारे प्राध्यापकांचे प्रशिक्षणही पूर्ण होईल, असे करमळकर यांनी सांगितले.
करोनाच्या काळात पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय आणि पुणे शहर स्तरावर मोठ्याप्रमाणात काम केले आहे. पुण्यातील करोनाचे रुग्ण कोठे कमी होत आहेत, कोणत्या भागात कंटेन्मेंट झोन हवा आहे, यासह इतर उपाययोजना काय कराव्यात, याची माहिती वेळोवेळी विद्यापीठाने पुणे महापालिकेला दिली आहे.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू