मंचर -आंबेगाव तालुक्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या 342 वर पोहोचली आहे. बुधवारी (दि. 5) या एकाच दिवशी सहा रुग्णांची वाढ झाली आहे, तसेच दोन रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून 96 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.
अवसरी खुर्द येथे एक, गंगापूर बुद्रुक येथे एक, पारगांव येथे एक, पिंपळगांव खडकी येथे एक, जाधववाडी येथे एक, शिनोली येथे एक असे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर खडकी येथील एका आणि शिनोली येथील एका बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, 239 रुग्ण बरे झाले आहेत. करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना होमक्वारंटाइन करण्यात आले आहे.
नागरिकांनी महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये, तसेच बाहेर पडताना मास्कचा वापर करावा, अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, घोडेगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिला आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे म्हणाले की, ग्रामस्थांनी जागरूकता बाळगावी.
करोनाबाधित रुग्ण आढळलेल्या गावांत बाहेर गावाहून येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. गावातील नागरिक घरात थांबणार असून बाहेर गावाहून गावात कोणीही येऊ नये. गावातील रस्ते आणि परिसराची फवारणी करून निर्जंतुकीकरण करून गावात स्वच्छता केली जात आहे.