बारामती – तालुक्यातील माळेगाव (लकडेनगर) येथे करोना बाधित रुग्ण सापडला आहे. त्याच्यावर पुणे शहरात उपचार सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. बारामती शहर व परिसरातील हा आठवा रुग्ण आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
बारामती शहरातील करोनाचे लोन ग्रामीण भागातही पसरत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. शहरात श्रीरामनगर, समर्थनगर, म्हाडा वसाहत परिसरात आजपर्यंत एकूण सात रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी भाजी विकेता असणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज बारामतीचे एकाच कुटुंबातील चौघे रुग्ण करोनामुक्त झाल्याची बातमी धडकली, तोच हा रुग्ण सापडल्याचा अहवाल पुढे आला आहे.
त्यामुळे बारामतीकरांच्या दिलासा काळजीमध्ये बदलला आहे. आज सापडलेला रुग्ण लकडेनगर माळेगाव बुद्रुक येथील आहे. बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागातील पहिला रुग्ण आहे. त्यामुळे ग्रामीण भागातअनेक लोकांना बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणीच बाहेर फिरू नये घरात राहावे, अशी सुचना प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
ही परिस्थिती लक्षात घेता लकडेनगर माळेगाव बुद्रुक हे केंद्र धरुन 5 किमी परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्या क्षेत्रात सर्व प्रकारची वाहतूक नियंत्रित करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा यांना यातून वगळले असून झोनच्या प्रत्येक मुख्य रस्त्यावर चौकीची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथून सर्व वाहने तपासणी करुन सोडण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच त्या भागात आरोग्य विभागामार्फत तातडीने सर्व्हे सुरू करण्यात आला आहे.
बारामती शहरातील करोनाचे लोन ग्रामीण भागातही पसरत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.