ओटावा, ब्रुसेल्स – करोना विषाणूची लागण मानवाबरोबर मार्जार कुळातील काही प्राण्यांना झाल्याची काही उदारणे यापूर्वीच पुढे आली आहेत. आता चक्क हरणांना आणि पाणघोड्यांनाही करोनाची लागण झाल्याचे उदाहरण पुढे आले आहे.
बेल्जियममधील ओटाया या प्राणीसंग्रहालयातील दोन पाणघोड्यांना करोना विषाणूची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. हे प्राणी संग्रहालय पुढील सूचना देईपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. पाणघोड्यांना करोना विषाणूची लागण होण्याचे हे पहिलेच उदाहरण असावे, असे या प्राणी संग्रहालयाच्या व्यवस्थापकांनी म्हटले आहे.
14 वर्षीय हिप्पो इमानी आणि 41 वर्षीय हिप्पो हेरर्मियेन यांना ही करोनाची लागण झाली आहे. या दोघांचेही नाक वहात आहे. त्याव्यतिरिक्त त्यांच्यात अन्य कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, असेही त्यांनी सांगितले. या प्राणीसंग्रहालयातील सर्व कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याचबरोबर कॅनडामधील एर्स्टी भागातील एका प्राणी संग्रहालयातील तीन हरणांनाही करोनाची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर देखरेख केली जात आहे.
नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत काही कुत्री आणि मांजरांनाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. आता या लागण झालेल्या कुत्र्यांची संख्या आणखीन वाढली आहे.