जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसायाला फटका : अफवांवर विश्वास ठेवू नका
पुणे -नवीन करोना बाधित विषाणूचच वाढता प्रादुर्भावामुळे सर्व देशांमध्ये सतर्कता पाळली जात आहे. मात्र, मांस खाल्याने हा विषाणू पसरत असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचा परिणाम मांस विक्रीवर (चिकन) झाला आहे. नेहमीच्या तुलनेत दररोज 300 टनांनी विक्री घटली असून, कोरोनाचा प्रसार चिकनमधून होत नसून, नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये,’ अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
करोनाचा प्रसार चिकनमधून होतो असा अपप्रचार केला जात असून त्याचा सर्वाधिक फटका पोल्ट्री व्यवसायाला बसला आहे. मात्र, चिकनपासून करोनाचा प्रसार होत नाही, त्याबाबत शास्त्रीय माहिती देण्यासाठी पशुसंवर्धन विभाग आणि ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. विनायक लिमये, ससूनचे उपअधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, अधीक्षक डॉ. अजय तावरे, उपअधीक्षक डॉ. विजय जाधव उपस्थित होते.
डॉ. परकाळे म्हणाले, राज्यात दररोज सरासरी 2 हजार 500 ते 2 हजार 800 टन चिकन विक्री होते. मात्र, करोनाच्या अफवांमुळे तो खप आता 2 हजार 200 टनांवर आला आहे. म्हणजे जवळपास प्रतिदिन 300 टन खप कमी झाला आहे. इतकेच नव्हे, तर तो 1,600 टनावर आला होता. मात्र, जनजागृती केल्याने तो आता वाढत आहे. तसेच दररोज राज्यात 3 कोटी अंडी खपतात. परंतू, अंड्यांच्या विक्री आणि पर्यायाने थेट कुक्कुट पालन व उत्पादक व व्यावसायिकांवर झाला आहे. चिकन व्यावसायिक किंवा शेतकऱ्यांकडून खरेदी दर जो प्रतिकिलो 72 रुपये होता, तो प्रतिकिलो 45 रुपयांवर आला आहे. परंतू, हे सर्व एका गैरसमजामुळे झाले आहेत.’
करोना हा सांसर्गिक रोग असून तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होतो. तो चीनमध्ये वटवाघळांपासून मानवात पसरल्याचे म्हटले जाते. तरी मानव आणि वटवाघळांमधील विषाणूंमध्ये खूप फरक आहे. आपल्याकडे चिकन, मटणासह कोणताही पदार्थ उकडून, शिजवून खाल्ले जातात. त्या तापमानात कोणतेही विषाणू जिवंत राहू शकत नाहीत.
-डॉ. राजेश कार्यकर्ते, उपअधिष्ठाता, ससून रुग्णालय.