कॅपॅसिटी संपली, आता करणार शेती
संगमनेर – दोन तासांच्या कीर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. मात्र मी जे बोललो, ते चुकीचं नाहीच. मी बोललेलं अनेक ग्रंथांत नमूद आहे. वादामुळे मला खूप त्रास होत आहे. एक-दोन दिवस बघेन आणि कीर्तन सोडून शेती करेन,’ असं निवृत्ती महाराज इंदुरीकर देशमुख म्हणाले.
सम तिथीला मुलगा आणि विषम तिथीला मुलगी, असं वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. या सर्व वादावर इंदुरीकर महाराजांनी शुक्रवारी (दि. 14) रात्री बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात झालेल्या एका कीर्तनात भाष्य केले. या कीर्तनाचा व्हिडिओ व ऑडिओ क्लीप त्यांचे समर्थक सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत.
इंदुरीकर महाराजांनी संपूर्ण वादाचा ठपका एका चॅनेलवर ठेवला आहे. ते म्हणाले, हे चॅनेलवाले काड्या करतात. या चॅनेलवाल्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु हे चॅनेल संपतील, मी नाही. ‘हे चॅनेलवाले व कॅमेरावाले माझ्या मागे लागलेत. इंदुरीकर संपवायला निघालेत. मी कशात सापडेना म्हणून मला गुंतवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मी आता एका वेगळ्या निर्णयाप्रत आलोय. एखाद-दुसरा दिवस जाऊ द्यायचा. आता लय झालं. फेटा ठेवून द्यायचा. आपली सहन करायची कॅपॅसिटी संपली, असं त्यांनी सांगताच उपस्थित चकित झाले. 26 वर्षे झाले मी बायको, पोर सोडून रात्रंदिवस प्रवास लोकांसाठी कष्ट करीत आहे. दोन-अडीच तासांच्या कीर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकते.
पण मी बोललेले वाक्य चुकीचं नाही. सम तिथीला मुलगा आणि विषम तिथीला मुलगी हे भागवत, ज्ञानेश्वरीतही सांगितलंय. मी म्हणतोय ते खरंय. तरी लोकं म्हणतायेत याला जेलमध्ये पाठवून द्यायला पहिजे. या चॅनेलवाल्यांनी माझ्या नावानं मोक्कार पैसा मिळाला आहे. मी काय त्यांच्याकडून एक रुपयाही घेतला नाही. ही मंडळी कोट्यधीश झाली आहे. माझ्या प्रत्येक व्हिडिओला एक एक लाख लईक आहेत. या चॅनेलवाल्यांना पैसाच मोजता येईना, इतका पैसा झालाय. पाहणाऱ्यांची संख्या खूप असल्याचंही ते यावेळी म्हणाले.