पूर्व भागानंतर आता पश्चिम पुण्यात पाय पसरले
वारजे-कर्वेनगर भागात रुग्णवाढीचा वेग 117%
कोथरूड, बावधन भागाचा वेगही तब्बल 62%
पुणे – शहरात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर शहराच्या मध्यभागी असलेल्या पूर्व पुण्यात करोनाने पहिले दोन महिने हातपाय पसरले. मात्र, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर करोना शहराच्या पश्चिमेकडील उपनगरांत वेग धरल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
विशेषत: कोथरूड- बावधन, वारजे-कर्वेनगर, तसेच औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतही करोना फोफावत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. दि. 28 जून ते 4 जुलै आणि दि. 5 जुलै ते 11 जुलै या कालावधीत या रुग्णवाढीचा वेग सर्वाधिक आहे.
शहरात 9 मार्च रोजी करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर आज अखेर करोनाबाधितांची आकडा 29 हजारांवर गेला आहे. विशेषत: 1 जूननंतर शहरात लॉकडाऊन शिथिल होताच, प्रतिबंधित क्षेत्रांबाहेर करोना बाधित वाढले. सुरुवातीच्या टप्प्यात शहराच्या पूर्वभागात या आजाराचे रुग्ण लक्षणीय वाढले होते. लॉकडाऊनमध्येही हा संसर्ग वेगाने पसरत होता.
तर शहराच्या पश्चिम भागात म्हणजेच कोथरूड, सिंहगड रस्ता, औंध- बाणेर भागात मोठया प्रमाणात सोसायट्या असल्याने लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी झाली. परिणामी, तेथे संसर्ग नियंत्रित होता. पहिले दोन महिने 30 पेक्षाही कमी बाधित असलेल्या या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत मागील तीन आठवड्यांत बाधित लक्षणीय वाढले आहेत. त्यामुळे यापुढील काळात नागरिकांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय बाधितांची वाढ
वारजे-कर्वेनगर : मार्च ते 27 जूनपर्यंत एकूण बाधित – 376. दि.28 जून ते 4 जुलै-485
( 117%) नवीन बाधित. दि.5 ते 11 जुलै कालावधीत 297 ( 59.90%) नवे बाधित.
कोथरूड-बावधन : दि. 9 मार्च ते 27 जूनपर्यंत एकूण बाधित – 460. दि.28 जून ते 4 जुलै- 443 नवे बाधित सापडले. दि.5 ते 11 जुलै कालावधीत 430 नवे बाधित सापडले.
औंध- बाणेर : दि. 9 मार्च ते 27 जूनपर्यंत एकूण बाधित- 481. दि. 27 जून ते 4 जुलै – नवीन 216 बाधितांची भर. तर दि. 5 जुलै ते 11 जुलै कालावधीत 234 नवीन बाधित सापडले आहेत, असे पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले.