पुणे -मागील दोन महिन्यांपासून वाढत असलेल्या “एच-3 एन-2’च्या रुग्णसंख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत चार रुग्ण सापडले आहेत. तर, करोनाबाधित संख्या वाढत आहे. दिवसभरात नव्याने 53 बाधितांची नोंद झाली आहे. या सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, करोनाच्या वाढत्या संसर्गाने घाबरून न जाता लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
दरम्यान, करोना पूर्णतः संपल्याचे समजून या आजाराकडे दुर्लक्ष करू नये. करोना काळात ज्या नियमांचे आपण पालन केले, ते नियम पुन्हा अंगी बाणवावेत, असे आवाहनही तज्ज्ञांनी केले आहे. या नियमांचे प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने पालन केले तर करोनाला पायबंद घालणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले.
एच3-एन-2चा संसर्ग वाढत असल्यामुळे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्व यंत्रणा कार्यान्वित करत तपासणीसाठी येणाऱ्या संशयितांचे स्वॅब घेतले जात आहेत. त्यासाठी विविध 12 ठिकाणी सुविधा ठेवण्यात आली आहे. खासगी रुग्णालयांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. मागील चार दिवसांपासून एच-3 एन-2ची रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत 296 संशयितांची नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 53 करोनाबाधित, तर 4 एच-3 एन-2चे रुग्ण आढळून आले, अशी माहिती महापालिकेचे साथरोग अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.
डॉक्टरांचा सल्ला
सर्दी, ताप, खोकला, घसा अशी लक्षणे असल्यास तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू करावेत.
अधिक त्रास जाणवत असेल तर रुग्णालयात दाखल व्हावे.
नव्या संसर्गाबद्दल नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे.
लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्तींची अधिक काळजी घ्यावी.
करोना काळात ज्या त्रिसूत्रीचा (मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर) आपण काटेकोर पालन केले तेच पुन्हा नियम पाळावेत.