केंदूर -शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पिंपळे जगताप येथील उपबाजार केंद्रातील एका कर्मचाऱ्याचा खासगी अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. यामुळे उपबाजार केंद्रातील सर्वच कर्मचारी व करोनाबाधित कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांची तपासणी करण्यात येणार आहे, असे सचिव अनिल ढोकले यांनी सांगितले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळला जावा, गर्दी कमी व्हावी, यासाठी शिरूरच्या मुख्य यार्डमध्ये पहाटे बाजार भरवला जात आहे. परिसरात वेळोवेळी फवारणी केली जात आहे. पिंपळे जगतापच्या उपबाजार केंद्रात करोनाचा शिरकाव झाल्याने मानवी वावर होऊ नये म्हणून सध्या हे उपकेंद्र बंदच ठेवले आहे, असे सभापती शंकर जांभळकर यांनी सांगितले.
करंदीत पन्नास वर्षीय व्यक्तीला बाधा
करंदी (ता. शिरूर) येथील एका पन्नास वर्षीय व्यक्तीला करोनाची बाधा झाली आहे. त्या व्यक्तीचा खासगी अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर घराचा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील 23 सदस्यांना क्वारंटाइन होण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती केंदूर आरोग्य केंद्राच्या अधिकारी सारिका तायवडे यांनी दिली