वॉशिंग्टन – आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर गेल्या काही कालावधीमध्ये वाढला असून त्याचे दुष्परिणामही आता समोर येऊन लागले आहेत. आता लेखनासारख्या सृजनशील क्षेत्राला सुद्धा या तंत्रज्ञानाचा फटका बसताना दिसत आहे, कारण अनेक मान्यवर आणि प्रसिद्ध लेखकांची बनावट पुस्तके सध्या बाजारपेठेत येऊ लागली आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून ही पुस्तके लिहिण्यात आली आहेत.
अमेरिकेतील बेस्ट सेलर लेखिका जेन फ्रीडमन यांच्या निमित्ताने हा मुद्दा समोर आला आहे. जेन फ्रीडमन यांनी 2018 नंतर एकही कादंबरी किंवा पुस्तकाचे लिखाण केले नव्हते पण काही दिवसापूर्वी त्यांच्या एका चाहत्याने त्यांच्या एका पुस्तकाची प्रशंसा त्यांच्याकडे केली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपल्या नावावर काही बनावट पुस्तके सुद्धा बाजारात विकली जात आहेत. त्यांनी अमेझॉन आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चौकशी केली असता त्यांच्या नावे तब्बल आठ पुस्तके त्या ठिकाणी विकली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
यापैकी एकही पुस्तक त्यांनी लिहिले नव्हते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून संबंधित लेखकाची भाषा आणि शैली यांची कॉपी करून नवीन पुस्तकाची निर्मिती केली जाते. हा एक प्रकारे कॉपीराइटचा भंग असला तरी कोणत्या कायद्याखाली कारवाई करता येऊ शकेल याबाबत अद्यापही संभ्रम आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ज्या प्रकारे कादंबऱ्या आणि इतर सृजनशील साहित्याची निर्मिती केली जात आहे, त्यामध्ये कोणताही फरक दिसत नाही.
म्हणजेच ओरिजिनल लेखक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून निर्माण करण्यात आलेले साहित्य याच्या भाषेमध्ये आणि शैलीमध्ये कोणताही फरक दिसत नसल्याने खरे काय खोटे काय हे अनेक वेळा समजूनही शकत नाही. अमेरिकेतील एका लेखिकेला सध्या हा अनुभव आला असला तरी जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत असाव्यात अशी शक्यता आहे.