ख्राईस्टचर्च : न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरी आणि शेवटची कसोटी रविवारपासून सुरू झाली आहे. उभय संघांमधील हा सामना ख्राईस्टचर्च येथील हॅगली ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे.
यजमान न्यूझीलंडने या सामन्यात धमाकेदार सुरुवात केली असून सलामीवीर विल यंग अर्धशतक करुन बाद झाला. तर हंगामी कर्णधार आणि सलामीवीर टॉम लॅथम पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 186 धावांवर नाबाद होता.
तिसर्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डावखुर्या डेवॉन कॉनवेने नेत्रदीपक फलंदाजी करत कसोटी क्रिकेटमधील तिसरे अर्धशतक पूर्ण केले. त्याने 148 चेंडूत नाबाद 99 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 चौकार आणि एक षटकाराचा समावेश आहे. या अर्धशतकासह कॉनवेने पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे.
ब्रॅडमन यांना टाकले मागे
डेवॉन कॉनवेने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या पाच सामन्यांत सर्वाधिक धावा करणार्या अव्वल फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले आहे. यामध्ये अव्वल स्थानी भारताचे माजी सलामीवीर सुनिल गावस्कर आहेत. त्यानंतर अनुक्रमे जॉर्ज हेडली, कोनॉर्ड हंट, डेवॉन कॉनवे, सर डॉन ब्रॅडमन यांचा क्रमांक आहे.
पहिल्या पाच सामन्यांत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
सुनिन गावसकर – 831 धावा
जॉर्ज हेडली – 714 धावा
कोनॉर्ड हंट – 622 धावा
डेवॉन कॉनवे – 613 धावा
सर डॉन ब्रॅडमन – 607 धावा
कॉनवेचा विश्वविक्रम
30 वर्षीय डेवॉन कॉनवे कारकिर्दीतील पाचवा कसोटी सामना खेळत आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पदार्पण केल्यापासून पहिल्या 5 सामन्यात पन्नास किंवा त्याहून अधिक वेळा धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
बांगलादेश विरुद्ध रविवारी केलेल्या अर्धशतकासह कॉनवेने कसोटी क्रिकेटमधील तिसरे शतक पूर्ण केले. त्याने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत 5 कसोटी सामन्यांच्या 9 डावात एक द्विशतक, 2 शतके आणि 3 अर्धशतके झळकावली आहेत. कॉनवेने इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स येथे 200 आणि एजबॅस्टन येथे 80, साउथॅम्प्टन येथे भारताविरुद्ध 54, बांगलादेशविरुद्ध माउंट मंगानुई येथे 122 आणि रविवारी ख्राईस्टचर्च येथे नाबाद 99 धावा केल्या आहेत.