औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका विधानामुळे पुन्हा वादंग निर्माण झाले आहे. त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे की जुन्या काळात शिवाजी महाराज हे आदर्श होते, पण आज नवीन काळात नितीन गडकरी हे आपले आदर्श आहेत असे त्यांनी नमूद केले आहे.
राज्यपालांनी नितीन गडकरी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली तसेच शिवाजी महाराजांना जुन्या काळातील आदर्श असे म्हटले आहे त्यामुळे आक्षेप घेतला जात आहे. यावेळी राज्यपालांच्या हस्ते नितीन गडकरी आणि शरद पवारांना सन्माननीय डिलिट पदवी देण्यात आली. त्या अनुषंगाने राज्यपालांनी हे विधान केले आहे.
राज्यपाल म्हणाले की आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो त्यावेळी तुमचे आदर्श कोण असा प्रश्न विचारला जायचा. त्यावेळी मी सुभाषचंद्र बोस असे नाव सांगायचो. ज्यांना गांधी, नेहरू आवडत ते त्यांची नावे सांगत. पण आजच्या काळात तुम्हाला तुमचे आदशे शोधण्यासाठी बाहेर कुठे पहायची गरज नाही, हे आदर्श तुम्हाला महाराष्ट्रातच सापडतील असे नमूद करीत त्यांनी नितीन गडकरी यांचे नाव घेतले. शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते असे त्यांनी यावेळी नमूद करीत गडकरींवर स्तुती सुमने उधळली.