कोलकाता – पश्चिम बंगालच्या पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांवर सामाजिक बहिष्कार घालण्याचे आवाहन करणारी पोस्टर्स लावण्यात आली आहेत, त्यावरून मोठेच वादंग निर्माण झाले आहे. आमच्या कार्यकर्त्यांवर विविध प्रकारचे अत्याचार सध्या सुरू आहेत.
आता तर आमच्या कार्यकर्त्यांवर सामाजिक बहिष्कारच घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे हे भीषण आहे, असे भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे, तर तृणमूल कॉंग्रेसने आपल्या वतीने ही पोस्टर लावण्यात आल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. भाजपच्याच लोकांनी तृणमूलला बदनाम करण्यासाठी ही पोस्टर्स लावली आहेत, असा आरोप तृणमूलने केला आहे.
मेहसुदा भागात ही पोस्टर्स आढळून आली आहेत. दुकानदारांनी भाजप कार्यकर्त्यांना माल विकू नये, तसेच त्यांना चहाच्या दुकानावरही चहा देण्यात येऊ नये, असे आवाहन यात करण्यात आले आहे. हा आदेश न पाळल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशाराही यात देण्यात आला आहे. ही पोस्टर्स महसिदा सर्व भारतीय तृणमूल कॉंग्रेस या नावाने छापण्यात आली आहेत.
तथापि, तेथील बूथ क्रमांक 176 व 179 या दोन बूथच्या भागापुरतीच ही पोस्टर्स आहेत. तृणमूलच्या नेत्याने म्हटले आहे की, आम्हाला भाजपच्या विरोधात अशी पोस्टर्स लावण्याची गरजच वाटत नाही, कारण लोकच त्यांच्यापासून दूर गेले आहेत. लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी भाजपच्याच लोकांनी ही पोस्टर्स लावली असावीत, असा आरोपही त्यांनी केला.