पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – दररोजच्या सुट्या पैशांवरून होणारा वाद कमी करण्यासाठी पीएमपीने ऑनलाइन तिकीट सेवा सुरू केली. त्यामुळे सुट्या पैशांचा वाद संपला आणि ऑनलाइन पेमेंट करूनही तिकीट न मिळणे, पेमेंट करताना अडचणी येणे असे नवे वाद सुरू झाले.
ऑनलाइन तिकीटविक्रीच्या तुलनेत येणाऱ्या तक्रारींची संख्या नगण्य असली, तरी पीएमपी प्रशासनाकडून या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन त्या सोडविण्यातही येत आहेत. मागील सहा महिन्यांत 3 हजार 561 तक्रारींपैकी 3 हजार 211 तक्रारी सोडविल्या आहेत, तर 350 तक्रारींवर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
पीएमपी प्रवासात तिकीट घेताना सुटे पैसे नसल्यामुळे प्रवासी आणि वाहकांमध्ये दररोज वादविवाद होत होते. चहावाल्यापासून माॅलपर्यंत सगळीकडे ऑनलाइन पेमेंटची सुविधा आहे, तर पीएमपीमध्ये का नाही, असा प्रश्न प्रवासी उपस्थित करू लागले. त्यामुळे पीएमपीएमएलकडून 1 आॅक्टोबर 2023 पासून सर्व बसमध्ये युपीआयद्वारे पेमेंट करण्याच्या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. प्रत्येक महिन्यात आॅनलाइन तिकीटविक्रीच्या संख्येत दुपटीने वाढ होत असून, प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
काय आहेत तक्रारी…
प्रामुख्याने पेमेंट झाले मात्र मशिनमध्ये दिसत नसल्यामुळे तिकिट मिळाले नाही. पेमेंट झाल्याचा मेसेज नाही; पण पैसे कट झाले. पेमेंट डबल झाले, अशा प्रकारच्या तक्रारी पीएमपी प्रशासनाकडे आल्या आहेत. त्यामध्ये प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधित बँकेशी संपर्क करून तक्रारी सोडविल्या आहेत.
मागील सहा महिन्यांत जवळपास 21 लाख 60 हजार 427 ऑनलाइन तिकीटविक्री झाली. त्यात केवळ 3 हजार 561 तक्रारी प्राप्त झाल्या. म्हणजेच तक्रारी येण्याचे प्रमाण केवळ 0.16 टक्के इतके आहे, तर तक्रारी सोडविण्याचे प्रमाण जवळपास 90 टक्के आहे.
1 आॅक्टोबर 2023 ते 28 मार्च 2024 पर्यंतची माहिती
एकूण तिकीटविक्री – 21 लाख 60 हजार 427
एकूण तक्रारी – 3 हजार 561
तक्रारी सोडविल्या – 3 हजार 211
तक्रारीं सोडविण्याची प्रक्रिया सुरू – 350
सरासरी दररोज येणाऱ्या तक्रारी – 20