सेऊल : उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा नेते किम जोंग उन यांची प्रकृती चिंताजनक झाली असल्याचे वृत्त पसरल्यामुळे जगभर मोठी खळबळ निर्माण झाली. किम यांच्यावर झालेलेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती अतिशय नाजूक झाल्याचे वृत्त अमेरिकेतील प्रसार माध्यमांनी दिले होते. या वृत्ताबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. त्यामुळे या वृत्तातील सत्यता पडताळून पाहण्याचे काम दक्षिण कोरियाच्या सरकारकडून केले जात असल्याचे सांगण्यात आले.
दक्षिण कोरियाच्या एकत्रीकरण विभागाच्या मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आणि राष्ट्रीय गुप्तचर सेवेच्या माध्यमातून या वृत्ताची सत्यता पडताळून बघितली जात आहे. मात्र त्यावर त्वरित कोणतेही खात्रीशीर स्पष्टिकरण मिळू शकलेले नाही. अमेरिकेच्या एका अज्ञात अधिकाऱ्याच्या हवाल्याने अमेरिकेतील “सीएनएन’ या प्रसिद्ध वृत्तसंस्थेने किम यांची प्रकृती अतिशय चिंताजनक झाली असल्याचे वृत्त दिले होते.
किम यांच्यावर राजधानी प्योंगयांग इथे हृदय शस्त्रक्रिया केली गेली आणि त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे “डेली एनके’ या अन्य माध्यमातून सांगितले गेले होते. दक्षिण कोरियाच्या “युनिफिकेशन मिनिस्ट्री’च्या माध्यमातून दोन्ही कोरियांमधील व्यवहार केले जातात. त्यांच्याकडूनही याबाबत कोणतेही स्पष्टिकरण मिळू शकलेले नाही. किम यांचे आजोबा आणि उत्तर कोरियाचे संस्थापक किम (दुसरे) संग यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित समारंभाला ते उपस्थित राहिले नव्हते. तेंव्हापासूनच त्यांच्या प्रकृतीबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली होती.