सेऊल (दक्षिण कोरिया) – उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी दक्षिण कोरिया आणि अमेरिकेविरोधात वाढत्या तणावाच्या पार्श्वभुमीवर पुन्हा एकदा अण्वस्त्रे डागण्याची धमकी दिली आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरिया कोरियाच्या द्विपसमुहामध्ये घुसू पहात आहेत. त्यामुळे युद्धाची शक्यता निर्माण होते आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
1950 ते 1953 दरम्यान चाललेल्या कोरिया युद्धाच्या 69 व्या स्मृतिदिनाच्या औचित्याने युद्धात सहभागी झालेल्यांना उद्देशून किम बोलत होते. उत्तर कोरियाचे सैन्य कोणत्याही विपरीत स्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम आहे. उत्तर कोरियाची अण्वस्त्रेही वापरासाठी सिद्ध आहेत, असे ते म्हणाले.
उत्तर कोरियाला कमी लेखण्याचेच धोरण अमेरिकेकडून राबवले जाते आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्त युद्धसरावातून अमेरिकेची दुटप्पी भूमिकाच दिसून येते. कारण उत्तर कोरियाने घेतलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांना अमेरिका नेहमीच चिथावणीखोर कृती म्हणून हिणवत असते, असेही किम यावेळी म्हणाले.
करोनाच्या साथीमुळे देशाच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम झालेला आहे. त्या स्थितीत देशातील ऐक्य अबाधित राखण्याच्या उद्देशाने किम यांनी हे भाषण दिले होते. किम यांनी जरी अण्वस्त्रे डागण्याची धमकी दिली असली तरी अमेरिकेसारख्या आधुनिक लष्कर असलेल्या देशावर उत्तर कोरियाकडून प्रथम अण्वस्त्रांचा वापर केला जाणार नाही, असे निरीक्षकांचे म्हणणे आहे.