कॅन्ट. बोर्ड उपाध्यक्ष पद शोभेपुरतेच

अधिकार वाढवावेत : लोकप्रतिनिधींची केंद्रीय सचिवांकडे मागणी

पुणे – कॅन्टोन्मेंट बोर्ड उपाध्यक्ष पदाला प्रत्यक्षात कोणताही अधिकार नाही. त्यामुळेच बोर्डात लोकप्रतिनिधी असूनही त्यांना काम करण्यासाठी फारसा वाव नसतो. बोर्डाच्या लोकप्रतिनिधींना काम करता यावे, यासाठी बोर्डाच्या उपाध्यक्षांचे अधिकार वाढविण्यात यावे, तसेच विकासकामांसाठी लोकप्रतिनिधींना प्रभागानुसार विकासनिधी मिळावा, अशी मागणी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या लोकप्रतिनिधींनी केली आहे.

लष्कर आणि नागरी प्रशासन यांचा ताळमेळ साधण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड निर्माण करण्यात आले असून, लष्करी अधिकारी हा या बोर्डाचा अध्यक्ष असतो, तर लोकप्रतिनिधींमधून एकाची उपाध्यक्षपदी निवड केली जाते. मात्र, हे पद नामधारी पद आहे. दरम्यान, संरक्षण सचिव अजयकुमार यांनी पुणे, खडकी आणि देहू या तीनही कॅन्टोन्मेंट बोर्डाची आढावा बैठक नुकतीच घेतली. यावेळी लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा उपस्थित केला. याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून, निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपत्कालीन व्यवस्थापनासाठी व्यवस्था उभारा
पावसाळ्यात लष्कर परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरले. यावेळी रहिवाशांचे मोठे नुकसान झाले. मात्र, ही परिस्थिती हाताळण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे पुरेशी व्यवस्था नव्हती. तसेच पुरात नुकसान झालेल्या नागरिकांना भरपाई देण्यासाठीदेखील बोर्डाकडे कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे बोर्डात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आणि निधी उभारण्याची गरज असल्याचे नगरसेवक प्रियंका श्रीगिरी यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.