ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे मिळाली चोरीला गेलेली दुचाकी

पिंपरी दुमाला येथील घटना : तंटामुक्‍तीचे अध्यक्ष सोनवणे यांची माहिती

रांजणगाव गणपती – राज्य शासनाने सुरू केलेले ग्राम सुरक्षा यंत्रणा टोल फ्री क्रमांकामुळे पिंपरी दुमाला येथील चोरीला गेलेली एकाची गाडी तात्काळ दोन दिवसांत परत मिळाली. केवळ टोल क्रमांक आणि तंटामुक्‍ती अध्यक्ष, पोलीस पाटील यांच्या सतर्कतेमुळे चोरीला गेलेली गाडी मिळाल्यानंतर दिगंबर कळसकर यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

पिंपरी दुमाला येथे (दि.6) मागील आठवड्यात कळसकर वस्ती येथील दिंगबर अरुण कळसकर यांची बजाज डिसकव्हर दुचाकी घरासमोरून चोरीला गेली. दिगंबरचे वडिल अरुण कळसकर हे काकड आरतीसाठी पहाटे उठले होते. गाडी चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानी लगेच ही माहिती तंटामुक्‍तीचे अध्यक्ष सोनवणे व पोलीस पाटील संतोष जाधव यांना फोनद्वारे कळवली. त्यानंतर सोनवणे यांनी पहाटे ग्राम सुरक्षा यंत्रणा टोल फ्री क्रमांकावर कॉल केला.

एकाचवेळी परिसरातील सर्व गावांना घटनेची माहिती दिली. ही घटना रांजणगाव पोलीस स्टेशनला कळवली. ज्यांनी ही गाडी चोरी केली. ते चोर दोन दिवसांनी शरदवाडी जांबुत (ता. शिरुर) येथे (दि. 8) रोजी पहाटे चोरीच्या उद्देशाने आले होते. नागरिकांच्या सतर्कतेने त्यांचा चोरीचा बेत फसला. घटनास्थळी दोन दिवसांपूर्वी चोरी केलेली कळसकर यांची गाडी सोडून चोरट्यांनी पळ काढला.कळसकर यांना संपर्क करून गाडी देण्यात आली.

गाडी मिळाल्यावर कळसकर यांनी या साठी मदत करणारे शरदवाडी ग्रामस्थ,ग्राम सुरक्षा यंत्रणा,रांजणगाव पोलिस स्टेशन चे पोलिस नाईक प्रफुल्ल भगत व टाकळी हाजी पोलिस स्टेशनचे गावडे यांचे आभार मानले.

पिंपरी दुमाला हे संपूर्ण गाव पोलीस पाटील संतोष जाधव व ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामसुरक्षा यंत्रणेला जोडले आहे. पोलीस प्रशासन आपल्या सुरक्षेसाठी नेहमी तत्पर आहेच. परंतु आपणही सतर्क राहून रात्री- अपरात्री घडलेल्या घटनांची माहिती देणे गरजेचे आहे. परिसरात चोरी व अन्य अनुचित प्रकार घडत असतील तर प्रतिबंध म्हणून प्रत्येक गावांनी आपल्या गावात राज्य शासनाने सुरू केलेले ग्राम सुरक्षा यंत्रणा टोल फ्री क्रमांक (18002703600) वर फोन करून संकटकाळात याचा वापर करावा. माहितीसाठी गावचे पोलीस पाटील, तंटामुक्‍ती अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधावा.
– संदीप सोनवणे, तंटामुक्‍ती अध्यक्ष, पिंपरी दुमाला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.