पीएमपीच्या आडमुठेपणावर हमीपत्राचे औषध

अडकवलेल्या बस अखेर वाहतूक पोलिसांनी सोडल्या

पुणे – कात्रज-देहू रस्ता बाह्यवळणमार्गे जाणाऱ्या पीएमपी बसचा थांबा अनधिकृत असल्याचे सांगत भारती विद्यापीठ वाहतूक पोलिसांनी येथील दोन बसेसना जॅमर लावले होते. या बसवर पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. मात्र, दंड भरण्यास पीएमपीने टाळाटाळ केली. त्यावर अखेर 9 दिवसांनी अडथळा ठरणाऱ्या बस थांब्यावरुन वाहतूक केली जाणार नसल्याचे हमीपत्र पीएमपीने देण्याच्या अटीवर वाहतूक पोलिसांनी बस सोडल्या आहेत.

कात्रज डेपोतून शहराच्या विविध भागातून बस सुटत असल्याने प्रवाशांची मोठी वर्दळ असते. येथून सुटणाऱ्या बससाठी थांबे निश्‍चित आहेत. मात्र, कात्रज चौकातून नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पीएमपीचा बस थांबा इतर वाहनांना अडथळा ठरत असल्याने भारती विद्यापीठ वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली होती. त्यानंतर पीएमपीने वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज देशमुख यांच्याशी चर्चा करुन अडथळा ठरणाऱ्या थांब्यावर प्रवासी वाहतूक न करण्याच्या हमीपत्र देणार असल्याचे सांगितले.

पाच हजारांचा दंड भरण्यास टाळाटाळ
पीएमपी बस एका दिवसात सुमारे लाखाच्या घरात उत्पन्न देते. मात्र, पीएमपीच्या दोन बसवर पोलिसांनी पाच हजाराचा दंड आकारला. मात्र, पीएमपीच्या आडमुठ्या धोरणामुळे दंड भरण्यास टाळाटाळ केल्याने बसेस 9 दिवस भारती विद्यापीठ वाहतूक विभागात उभ्या होत्या. या काळात दोन बसेसद्वारे मिळणारे उत्पन्न गमावून पीएमपीने स्वत:चे नुकसान करून
घेतले आहे.

कात्रज चौकाजवळ पीएमपीचा अनधिकृत थांब्यावरुन प्रवासी वाहतूक सुरू असल्याने दोन बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पीएमपी प्रशासनाने अडथळा ठरणाऱ्या थांब्यावरुन वाहतूक न करण्याच्या हमीपत्रावर बस सोडण्यात आल्या आहेत.
– पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग

Leave A Reply

Your email address will not be published.