जाधववाडी, दि. 1 (वार्ताहर) -पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटी होऊ पाहत आहे. परंतु येथील नागरिकांसाठी देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांकडे ना महापालिका प्रशासनाचे लक्ष आहे ना संबंधित विभागांचे. त्यामुळे शहरात असणाऱ्या बहुतांश पेट्रोल आणि सीएनजी पंपावर पाणी, टेलीफोन, शौचालय आदी सुविधा पुरविण्यात येत नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. ग्राहकांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या अस्थापनांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जाधववाडी येथे पिंपरी चिंचवड शहरातील सर्वांत पहिला सीएनजी पंप सुरू करण्यात आला. परंतु आज या पंपावर येणाऱ्या ग्राहकांसाठी आवश्यक आणि शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार सोयीसुविधा पुरविण्यात येत नाहीत. त्याबाबत त्यांना विचारले असता ते उडावाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे येथील ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. येथील सीएनजी पंपावर येणाऱ्या ग्राहकांसाठी पिण्याचे पाणी नाही. तसेच शौचालय बांधण्यात आलेली आहेत परंतु त्यांचे दरवाजे कुलूप लावून बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे पंपावर सीएनजी भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना व कुटुंबीयांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शासन नियमानुसार पेट्रोल पंप व सीएनजी पंपावर ग्राहकांसाठी असणाऱ्या सुविधा उपलब्ध नसतील तर संबंधितांचा परवाना रद्द होऊ शकतो. त्यासाठी ग्राहकांनी जागृक असणे आवश्यक आहे.
व्यवस्थापनाची उडावाउडवीची उत्तरे
महापालिकेकडून पाणीपुरवठा होत नाही. येथील रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम महापालिकेचे आहे. पिण्याचे पाण्याबाबत विचारले असता ते नादुरुस्त आहे. त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. अशी उडावाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत.
महिलांची कुचंबणा
सीएनजी पंपावर बहुतांश वेळा ग्राहकांना लाइनमध्ये बराचवेळ वाहने घेऊन उभा रहावे लागत आहे. त्यामुळे घरातील सदस्य पंपाच्या परिसरात गाडीतून खाली उरलेले असतात. त्यात महिलांसाठी पेट्रोल पंप अथवा सीएनजी पंपावर हक्काचे शौचालय असते. परंतु जाधववाडी येथील सीएनजी पंपावरील शौचालय व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मागील काही महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या महिला ग्राहकांना शौचालयाला जाता येत नसल्याने त्यांची मोठी कुचंबणा होत आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा सुरू करण्याची मागणी होत आहे.
कायदा काय सांगतो…
पेट्रोल पंप अथवा सीएनजी पंपावर ग्राहकांसाठी विविध सोयीसुविधा देणे संबंधितांवर बंधनकारक आहे.
मोफत पाण्याची व्यवस्था करणे.
शौचालय उभारणे तसेच ते वापरासाठी खुले ठेवणे.
वाहनांची मोफत हवा चेक करून देणे.
ग्राहक तक्रार नोंद वही ठेवणे.
प्रथमोपचार पेटी उपलब्ध ठेवणे.