अधिवेशनाच्या तोंडावर कॉंग्रेसचे पुन्हा नाराजीनाट्य? पक्षाच्या मंत्र्यांना कमी निधी मिळाल्याची तक्रार

मुंबई – राज्याच्या महाविकास आघाडीत पुन्हा एकदा निधी वाटपावरून कुरबुरी सुरू झाल्याच्या बातम्या काही माध्यमांतून झळकू लागल्या आहेत. कॉंग्रेस मंत्र्यांनी या आधी देखील निधी वाटप बाबत नाराजी जाहीर केली होती.

पण अर्थसंकल्पाची तयारी सुरू असताना अर्थमंत्री अजित पवार यांनी विभागवार बैठका घेतल्या. त्या बैठकांमध्ये कॉंग्रेसचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात वार्षिक आराखड्यात निधी कमी केल्याची तक्रार कॉंग्रेस मंत्र्यांनी केली आहे.

कॅबिनेट संपल्यावर कॉंग्रेसचे सर्व मंत्री महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यावर गेले होते. तिथे मंत्र्यांनी आपल्या विभागाला मिळणारा निधी, त्याला लावलेली कात्री,जिल्ह्याला मिळणारा निधी याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर बाळासाहेब थोरात आणि मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी पोहचले.

तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यासमोर कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी आपली भूमिका मांडली. अर्थमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीच्या नेत्यांना अर्थमंत्री झुकत माप देत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांना अधिकच निधी मिळाल्याने कॉंग्रेसने नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी राज्यमंत्र्यांच्या अधिकारांचे वाटप रखडले असल्याचे कॉंग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले.

कॉंग्रेसच्या मंत्र्यांना मिळत नसणाऱ्या निधींबाबत याआधी जाहीररित्या अशोक चव्हाण,विजय वड्डेटीवर यांनी वाचा फोडली आहे. बाळासाहेब थोरात यांनी देखील याबाबत पत्र लिहिले होते. तरीही याबाबत कारवाई न केल्याने अर्थसंकल्पाच्या आधी कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आणि मुख्यमंत्र्यांसमोर आपली भूमिका मांडली.

कॉंग्रेसच्या तक्रारीनंतर येणाऱ्या अर्थसंकल्पात काही बदल दिसणार का? कॉंग्रेस मंत्र्यांना निधी मिळणार का हा प्रश्न आहे. तूर्त त्यावर अधिकृतपणे कोणत्याही पक्षाकडून अथवा नेत्याकडून भाष्य करण्यात आलेले नाही. मात्र मंत्र्यांची नाराजी अजित पवार यांना दूर करावीच लागेल अशी चिन्हे आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.