नवी दिल्ली- कॉंग्रेस् पक्षाच्या सोशल मिडीया प्रमुख दिव्या स्पंदना यांनी त्यांचे ट्विटर अकाउंट आणि त्यांच्या यापूर्वीचे ट्विट डिलीट केले आहेत. त्यामुळे त्यांच्या भविष्यातील योजनांबाबत तर्कवितर्क केले जाऊ लागले आहेत. स्पंदना यांनी कोणतेही वादग्रस्त ट्विट केलेले नव्हते. त्यामुळे ट्विटरवरच स्पंदना यांच्या या कृतीबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
स्पंदना यांनी अलिकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सोशल मिडीयावर कॉंग्रेसच्या प्रचाराचे नेतृत्व केले होते. या निवडणुकीत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाल्यावर अनेक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.
स्पंदना यांनी ट्विटर अकाउंट डिलीट का केले, याबाबत कॉंग्रेसकडून कोणतेही अधिकृत स्पष्टिकरण देण्यात आलेले नाही. मात्र स्पंदना या राजकारणापासून काही काळ दूर राहणार असल्याचे त्यांचा निकटवर्तीयांनी सांगितले. स्पंदना या माजी खासदार आणि अभिनेत्री आहेत. ट्विटर अकाउंट डिलीट करण्याबाबत त्यांच्याकडूनही कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.