पुण्यामधील फुटबाॅलला अच्छे दिन येणार

सेव्हिला एफ.सी. राबविणार लालिगा फुटबॉल स्कूल्स प्रोग्राम

पुणे – लालिगाचा भारतातील प्रमुख कार्यक्रम लालिगा फुटबॉल स्कूल्समध्ये आता लालिगाचा क्‍लब सेव्हिला एफ.सी.चा थेट सहभाग असणार आहे. पुण्यातील टर्फअपमधील द फुटबॉल स्कूल्स प्रोजेक्‍ट्‌स आता क्‍लबद्वारे चालविले जाणार आहेत. या सहयोगाद्वारे कोचेससाठी प्रशिक्षक कार्यक्रम राबविणे, सहभागी विद्यार्थांना प्रशिक्षण संच पुरविणे आणि प्रोत्साहनपर भेटवस्तू व संस्थेचे नामचिन्ह असलेल्या गोष्टींचे वितरण करत अधिकाधिक विद्यार्थ्यांना या कार्यक्रमांशी जोडून घेणे अशासारख्या उपक्रमांमध्ये सेव्हिला एफ. सी.चा सहभाग असणार आहे.

देशामध्ये तळागाळाच्या स्तरापासून खेळांचा प्रसार व्हावा या उद्देशाने 2018 साली लालिगा फुटबॉल स्कूल्स कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रयत्नामध्ये आता सर्वोत्तम लालिगा क्‍लब जोडले जात असून भारताच्या तीन शहरांमध्ये लालिगा फुटबॉल स्कूल्स कार्यक्रम राबवित या देशातील उद्याचे क्रिडापटू घडविण्याच्या कामी गुंतवणूक करत आहेत. भारताच्या 14 शहरांमध्ये 30 हून अधिक केंद्रे चालविणा-या या प्रकल्पामध्ये आजवर 10,000हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे. या प्रयत्नात लालिगा क्‍लब सहभागी झाल्याने कोचेसना आणखी प्रगत तांत्रिक सहाय्य मिळू शकेल, ज्याचा फायदा देशातील होतकरू फुटबॉलपटूंना होईल.

लालिगा इंडियाचे मॅनेजिक डायरेक्‍टर जोस अँटोनियो कचाझा म्हणाले, ”आम्ही इथल्या बाजारपेठेशी आणि इथल्या युवा होतकरू फुटबॉलपटूंच्या आकांक्षांशी बांधिल आहोत. इथल्या फुटबॉल क्षेत्रावर आमचा गहिरा ठसा उमटावा यादृष्टीने गेल्या सात महिन्यामध्ये आम्ही विविध उपक्रम हाती घेतले. आमच्या सर्वोत्तम क्‍लबच्या सहाय्याने आम्ही सुरू केलेल्या सर्वात अलीकडचा प्रकल्प विद्यार्थ्यांना फुटबॉल शिकण्याचा परिपूर्ण अनुभव मिळवून देईल. आमच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या अशा या प्रकल्पासाठी सेव्हिला एफ.सी.च्या साथीने काम करण्यास आम्ही अत्यंत उत्सुक आहोत.”

सेव्हिला एफ.सी.चे अध्यक्ष जोस कॅस्ट्रो कार्मोना म्हणाले, ”भारत हा एक असा देश आहे, जिथे सेव्हिला एफ. सी.ला आपली पाळेमुळे रुजवायला आवडेल आणि तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणा-या या अप्रतिम प्रकल्पासाठी लालिगाच्या साथीने काम करत असल्याचा आम्हाला आनंद आहे. सेव्हिला एफ.सी. क्‍लबकडे शिक्षण व कौशल्य विकासाचा भरपूर अनुभव आहे आणि पुण्यातील प्रतिभाशाली खेळाडूंना आम्ही हाच अनुभव शैलीदारपणे, मूल्यांच्या जपणुकीसह आणि आमच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग असलेल्या आमच्या गुणवैशिष्ट्‌यांच्या साथीने निश्‍चितच मिळवून देऊ याची आम्हाला खात्री आहे.

या गुणवैशिष्ट्‌यांच्या जोरावर आमची टीमला यूईएफएच्या मानांकनांनुसार युरोपातील आठ सर्वोत्तम क्‍लब्जच्या यादीत स्थान मिळाले असून तो जगातील सर्वात महत्त्वाच्या क्‍लब्जपैकी एक बनला आहे. पुण्यातील मुलांना या उपक्रमामुळे नवी प्रेरणा मिळेल, आमच्या कुटुंबाचा भाग बनण्याची इच्छा त्यांच्या मनी रुजेल आणि त्यातून प्रवाहाविरुद्ध झगडणारी, आपल्या स्वप्नांचा जिद्दीने पाठपुरावा करणारी लढाऊ टीम आकाराला येईल, असा आम्हाला विश्वास आहे.”

या कार्यक्रमातील सर्वोत्तम कामगिरी करणा-या खेळाडूंना प्रशिक्षणाचा अधिक सर्वंकष अनुभव मिळावा तसेच फुटबॉलच्या जगाशी त्यांची अधिक खुलेपणाने ओळख व्हावी, या हेतूने लालिगाने अलिकडेच लालिगा फुटबॉल स्कूल्स स्कॉलरशिपची घोषणा केली. ही शिष्यवृत्ती जिंकणा-या खेळाडूंना स्पेनमध्ये फुटबॉल प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून यावर्षी चार विद्यार्थी लालिगा क्‍लब, सीडी लेगाने यांच्याबरोबर दोन आठवड्यांसाठी प्रशिक्षण घेतील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.