जयपूर – राजस्थानमध्ये सत्तेवर असणाऱ्या कॉंग्रेसने राज्यसभा निवडणुकीत बाजी मारली. त्या पक्षाचे तिन्ही उमेदवार विजयी झाले. तर, चौथी जागा भाजपला मिळाली. त्यामुळे अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले मीडिया सम्राट सुभाष चंद्रा यांच्या पदरी अपयश आले.
राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या 4 जागांसाठी 5 उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक रंगतदार बनली. भाजपने एक उमेदवार देतानाच चंद्रा यांनाही पाठिंबा दिला. त्यामुळे राज्यसभा निवडणूक कॉंग्रेससाठी आव्हानात्मक बनल्याचे मानले गेले. मात्र, मुकूल वासनिक, रणदीप सुर्जेवाला आणि प्रमोद तिवारी हे कॉंग्रेसचे तिन्ही आमदार विजयी झाले.
भाजपचे उमेदवार घनश्याम तिवारी यांनीही विजय मिळवला. मात्र, चंद्रा यांचा पराभव त्यांच्याबरोबरच त्यांना पाठिंबा देणाऱ्या भाजपसाठीही हादरा मानला जात आहे. राजस्थानमध्ये भाजपच्या एका आमदारासह काहींनी क्रॉस-व्होटिंग केल्याची माहिती पुढे आली आहे. राजस्थानात विधानसभेचे एकूण 200 आमदार आहेत.
त्यामध्ये कॉंग्रेसचे संख्याबळ 108, तर भाजपचे 71 इतके आहे. अपक्ष आणि लहान पक्ष मिळून 126 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा कॉंग्रेसकडून केला जात होता. तो खरा ठरल्याने कॉंग्रेसने तिन्ही जागा मिळवण्यात यश मिळवले. प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी किमान 41 मते मिळवणे आवश्यक होते. मात्र, अपक्ष उमेदवार चंद्रा 30 मतांचाच पल्ला गाठू शकले.