जयपूर – राजस्थानात दर निवडणुकीत सरकार बदलण्याची प्रथा असते परंतु यावेळी ही प्रथा मोडीत काढली जाईल आणि कॉंग्रेस राजस्थानात इतिहास घडवेल असा विश्वास कॉंग्रेस खासदार दीपेंद्रसिंग हुड्डा यांनी व्यक्त केला आहे. हुडा या राज्यात कॉंग्रेसच्या प्रचारासाठी तळ ठोकून आहेत.
कॉंग्रेस पक्षाने नेहमीच राजस्थानमधील लोकांच्या भल्यासाठी काम केले आहे. हा या सरकारचा सर्वात मोठा यूएसपी आहे. पुढील वर्षी हरियाणात निवडणुक आहे. आम्ही राजस्थान सरकारची सर्व धोरणे हरियाणामध्ये राबवू असेही त्यांनी नमूद केले आहे. कॉंग्रेस खासदार इम्रान प्रतापगडी हेही राजस्थानात पक्षाच्या प्रचारासाठी आले असून त्यांनीही या राज्यात कॉंग्रेसच पुनरागमन करेल असा दावा केला आहे.
ते म्हणाले की गेहलोत सरकारने संपुर्ण देशाला आदर्शवत ठरेल असे सरकार दिले आहे. त्यांनी ईडी आणि सीबीआयच्या गैरवापरावरही यावेळी टीका केली. याच यंत्रणांचा वापर करून त्यांनी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील सरकारे पाडली. आजही ते याच यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांना धमकावण्याचे काम करीत आहेत असे ते म्हणाले.