टाईम स्क्वेअरमध्ये चीन विरोधात निदर्शने

 

 

न्युयॉर्क – न्युयॉर्कमध्ये प्रख्यात टाईम स्क्वेअरमध्ये आज भारतीय अमेरिकन नागरिकांनी भारत माता की जयच्या घोषणा देत चीनच्या विरोधात उग्र निदर्शने केली. चीनवर आर्थिक बहिष्कार घालण्याची मागणीही त्यांनी केली. न्युजर्सी आणि न्युयॉर्कच्या परिसरात राहणारे असंख्य भारतीय यात सहभागी झाले होते. फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशनने या निदर्शनांचे आयोजन केले होते. चीनने भारतीय हद्दीत केलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात चिनी मालावर बहिष्कार घालण्याचा निर्धारही या नागरिकांनी व्यक्त केला. चिनी आक्रमणात शहीद झालेल्या जवानांनाही या निदर्शकांनी श्रद्धांजली वाहिली.

निदर्शकांनी तिबेटींच्या स्वातंत्र्य लढ्यालाही यावेळी पाठिंबा देत चिन्यांनो तिबेट सोडून निघून जा, चीनमधील अल्पसंख्याकांचा वंशविच्छेद थांबवा अशी घोषणा देणारे फलकही तेथे फडकावण्यात आले होते. यावेळी बोलताना तेथील सामाजिक कार्यकर्ते भंडारी म्हणाले की, चीनची सीमा चौदा देशांना लागू असून आज ते 18 देशांच्या विरोधात कारवाया करीत आहेत. या सर्व 18 देशांना एकत्र आणून चीनच्या विरोधात प्रभावी आघाडी उघडली पाहिजे आणि हे काम आज भारत करू शकतो. भारताने ते करावे अशी मागणीही त्यांनी केली. विविध देशांच्या राजदूतांना चीनच्या विरोधात एकत्र आणण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.