मुंबई – राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भाजपकडून दोन मोठ्या ऑफर देण्यात आल्या आहेत. ते भाजपसोबत आल्यास त्यांना केंद्रात कृषीमंत्रीपद आणि निती आयोगाचे अध्यक्षपद देण्यात येईल अशी ऑफर भाजपने दिली आहे, असा दावा माजी मुख्यमंत्री काॅंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मात्र शरद पवार यांनी ही ऑफर नाकारली असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. याबाबत फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रात वृत्त प्रसारीत करण्यात आले आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अजित पवार भाजपसोबत सत्तेत सामील झाल्यानंतर शरद पवार देखील भाजपसोबत येतील अशी शक्यता भाजप नेत्यांना वाटत होती. मात्र अजून तरी तसे काही घडले नाही. त्यामुळे केंद्रातील भाजपच्या सत्तेत सामील होण्यासाठी शरद पवारांना या दोन ऑफर देण्यात ाआल्या आहेत. पुण्यामध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांची चोरडिया यांच्या निवासस्थानी भेट घेतली या भेटीत या ऑफरबाबत चर्चा झाल्याचे चव्हाण म्हणाले.
त्याचबरोबर राष्ट्रावीदच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जयंत पाटील यांनाही भाजपकडून मोठी ऑफर असल्याचेही चव्हाण यांनी यावेळी म्हंटले आहे. याबाबत अजित पवारांनी दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा हा दावा खोडला आहे. कोल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर बोलताना अजित पवार म्हणाले की, शरद पवार हे आमचे कुटुंबप्रमुख आहेत. त्यांना भेटण्यात काय गैर आहे, असा सवालही त्यांनी केला. इथून पुढेही आम्ही भेटत राहू, पण त्याचा राजकीय अर्थ काढू नये, अशी सूचनाही त्यांनी केली. अतुल चोरडिया यांच्या घरातून बाहेर पडताना गेटला धडकलेल्या गाडीत मी नव्हतोच, असा पवित्रा अजित पवांरांनी घेतला. मी उजळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता आहे. मी कुठेही लपून जात नाही असेही अजित पवारांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी केंद्रात मंत्रिपदाच्या ऑफरवरून पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आणि चव्हाण यांचा दावा खोटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.