मुंबई : माजी आमदार अमरिश पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपचा झेंडा हाती धरताना अमरिश पटेल यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता.
पटेल यांच्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 30 मार्चला मतदान होणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे धुळे विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठीही शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांची एकजूट होण्याची चिन्हे आहेत.
महाविकास आघाडीतर्फे कोणाला रिंगणात उतरवले जाणार याची उत्सुकता आहे. भाजपच्या गोटात गेलेले अमरिश पटेलच पक्षाचे उमेदवार असतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे पटेलांना आपली जागा टिकवता येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, या जागेसाठी 12 मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. 30 मार्चला मतदान प्रक्रिया पार पडणार असून दुसऱ्याच दिवशी म्हणजे 31 मार्चला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.