नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्य विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा हायकमांडकडे पाठविल्याच्या चर्चेमुळे देशाची राजधानी दिल्लीत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील यांना चौकशी करण्यास सांगितले असल्याचेही समजते.
महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबतचे संबंध विकोपाला गेल्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी राज्य विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चेने दिल्लीत खळबळ माजली आहे. थोरात यांनी आपला राजीनामा कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना मेलवर पाठविला असल्याचे समजते.
पटोले यांच्यासोबत काम करणे आता अवघड झाले आहे, असे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले असल्याचेही समजते. दरम्यान, प्रभारी एच. के. पाटील सध्या कर्नाटकमध्ये असून ते तेथूनच मुंबईला जाणार आहेत.