हैदराबाद – कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी 20 जुलै रोजी तेलंगणातील एका जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत. यावेळी बीआरएस पक्षाचे माजी मंत्री जुपल्ली कृष्ण राव आणि इतर नेते कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. हैदराबादपासून सुमारे 160 किमी अंतरावर महबूबनगरजवळील कोल्लापूर येथे ही सभा होणार आहे, असे राज्यातील कॉंग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मल्लू रवी यांनी सांगितले.
जुपल्ली कृष्ण राव यांच्यासोबत, विद्यमान बीआरएस आमदार कुचुकुल्ला दामोदर रेड्डी देखील पक्षात सामील होतील, असे त्यांनी पीटीआय येथे सांगितले. जुपल्ली कृष्णा राव, माजी खासदार पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय तेलंगणात कॉंग्रेस पक्षाला मोठे बळ देणारा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
श्रीनिवास रेड्डी यांनी या महिन्याच्या सुरुवातीला खम्मम शहरात झालेल्या एका जाहीर सभेत राहुल गांधींच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कर्नाटकातील विजयामुळे उत्साहित झालेल्या कॉंग्रेस पक्षाला तेलंगणातही अशाच यशाची अपेक्षा असून त्यासाठी पक्षाने या राज्यात मोठा जोर लावला आहे. बीआरएस पक्षाचे अनेक नेते कॉंग्रेस मध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळेही कॉंग्रेस मध्ये उत्साह संचारला आहे.