अहमदाबाद – गुजरातेतील पोट निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले असून येथे भाजपने काँग्रेसला व्हाईट वॉश दिला आहे. गुजरात येथे रिक्त ८ जागांसाठी ३ नोव्हेंबरला मतदान घेण्यात आले होते. त्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला.
भाजपने या आठही जागा जिंकल्याने १८२ सदस्य संख्या असलेल्या गुजरात विधानसभेत पक्षाचे संख्याबळ १११ इतके वाढले आहे.
दरम्यान, निकालांबाबत काँग्रेसने नाराजी व्यक्त करताना, ‘मतदार दलबदलू आमदारांना धडा शिकवतील अशी अपेक्षा होती’ अशी खंत व्यक्त केली. राज्यसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसच्या आठ आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
यातील ५ जणांना भाजपने पोट निवडणुकांमध्ये संधी दिली. यात प्रद्युम्नसिंह जडेजा (अब्दासा), ब्रजेश मेरजा (मोरबी), अक्षय पटेल (करंजन), जितू चौधरी (कापराडा) आणि जे व्ही काकडिया (धारी). यांचा समावेश होता.
विशेष म्हणजे काँग्रेसला राजीनामा ठोकून कमळाच्या चिन्हावर लढलेले हे पाचही उमेदवार निवडणूक जिंकले आहेत.