पुणे- मेडिकल दुकानावर दरोड्याच्या घालण्याच्या तयारीत असणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पाठलाग करून अटक केली. त्यांचे दोन साथीदार मात्र पळूण जाण्यात यशस्वी झाले.कोरोनाच्या काळात मेडीकल दुकांनाचा आर्थिक व्यावहार मोठा असल्यामुळे आरोपी तळजाई सहकारनगर परिसरातील मेडीकल दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते
अजय बाळू ओव्हाळ (वय.30), शुभम सुनिल शिंदे (वय.25), विनायक महादेव कांबळे (वय.28,राहणार तिघेही कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर त्यांचे दोघे साथीदार पंकज लवटे व रामा लवटे अशी पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक आरोपींच्या ताब्यातून दोन पालघन, मिरचीपूड व एक मोपेड दुचाकी असा 64 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी उपनिरीक्षक संजय गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. पाच जणांच्या विरुद्ध आर्म ऍक्टसह सहकारनगर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.न्यायालयाने तिघांना 12 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड हे आपल्या पथकासह तळजाई सहगारनगर परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी पोलिस हवालदार अजय थोरात व अशोक माने यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, चार ते पाच जण सहकारनगर परिसरात एकत्र जमणार असून, एका मेडीकल दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार पथकाने सापळा रचून छापा टाकाला. यावेळी तिघांना अटक करण्यात आली असून, दोघांनी पळ काढला.
अजय ओव्हाळ हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापुर्वी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गंभीर दुखापतीचे तीन गुन्ह्यासह नोकराला मारहाण करून जखमी करणे असे चार गुन्हे दाखल आहेत. विनायक कांबळे याच्यावर देखील हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त बच्चन सिंह, पोलिस निरीक्षक सुनिल ताकवले, अरुण वायकर, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, अंमलदार थोरात, माने, पवार, माळवदकर यांच्या पथकाने केली.