पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीचे काम आयुक्त शेखर सिंह यांच्या सूचनेनुसार मुदतीत पूर्ण करण्यात यावे. प्रत्येक कामगार, अधिकारी कामावर असताना सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आदेश अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी आज नव्याने तयार होत असलेल्या महापालिका नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाची तसेच निगडी, भक्ती-शक्ती ते मुकाई चौक आणि मुकाई चौक ते भोंडवे कॉर्नर रस्त्यांची आणि रावेत येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामांची पाहणी केली, त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले. प्रकल्पांच्या पाहणी करताना त्यांच्यासोबत सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता बापुसाहेब गायकवाड, उप अभियंता विजयसिंह भोसले, कनिष्ठ अभियंता संतोष कुदळे आणि केतकी कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी महापालिका नवीन इमारतीच्या खोदकामाची पाहणी करून प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेतली. सहशहर अभियंता ओंभासे यांनी नवीन इमारतीस 36 महिने लागणार असून सुरू असलेल्या कामाबाबत माहिती दिली. त्यानंतर खोराटे यांनी रावेत येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामांची पाहणी केली.
ओंभासे यांनी जमीन अधिग्रहण करण्यात झालेल्या विलंबामुळे प्रकल्पाचे काम थांबले होते. परंतू, आता हे काम वेगाने सुरू असून पुढील तीन महिन्यात काम पूर्ण होईल असे सांगितले. त्यानंतर कार्यकारी अभियंता बापुसाहेब गायकवाड यांनी रावेत येथील उड्डाण पूल ते मुकाई चौक या रस्त्यांची विकास मंजूर आराखड्यातील 45 मीटर रुंदीप्रमाणे अद्यापही काही जागा ताब्यात नसल्याने या रस्त्याचे कामास विलंब झाल्याचे सांगितले.