हर्षद कटारिया
मार्केट यार्ड – पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती पार्किंगमधील जागेत फिश मार्केट व पोल्ट्री व्यवसायास जागा देण्यावर ठाम आहे. यास माजी नगरसेवक, व्यापारी तसेच परिसरातील नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे. आमदार माधुरी मिसाळ यांनीही विरोध केला आहे, चर्चेनंतरही बाजार समिती आपला निर्णय बदलण्यास तयार नाही, त्यामुळे बाजार समितीची नवनिर्वाचित हेकेखोर समितीच बरखास्त करण्याची व्यापाऱ्यांनी केलेली मागणी मंत्रालयात आमदार मिसाळ यांच्याद्वारे मांडण्यात येणार आहे. त्यामुळे हा मुद्दा मंत्रालयात गाजण्याची शक्यता आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीची शिवनेरी पथावरील भाजी मार्केट सामोरील पार्कींग मधील जागा होलसेल फिश मार्केट व पोल्ट्री व्यवसायास देण्यासाठी बाजार समिती कमिटीमध्ये ठराव मंजूर केल्याबाबत “प्रभात’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सदर ठरावास नागरिकांकडून कडाडून विरोध होत आहे. स्थानिक पातळीवर येत्या काही दिवसांत नागरिकांनी बाजार समितीच्या या निर्णया विरोधात आंदोलने करण्याची तयारी सुरुवात केली आहे. पार्किंग जागेशेजारी असलेल्या नाल्यात सदर कचरा पडल्यास महर्षीनगर, मुकुंदनगरच्या सोसायट्यांना त्रास होणार असल्याने या व्यवसायास सदर सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे.
बाजार समितीची पार्कींग भागातील काही मोकळी जागा शेड बांधून व ओटे बांधून फिश मार्केट व पोल्ट्री व्यवसायासाठी देणार आहोत. फिश मार्केट शेती नियमात असल्याने पणन खात्याकडून परवानगी घेण्याची गरज नाही. बांधकाम करायचे असेल तर पणन खात्याकडून परवानगी घेण्याची गरज असते. – राजाराम धोंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती
बाजार समितीमध्ये मी पदाधिकारी असून सदर परिसरात राहण्यास आहे. स्थानिक पातळीवर नागरिकांना त्रास होतील, असे निर्णय होणे अयोग्य आहे. बाजार समितीमध्ये फिश मार्केट व्यवसायाला परवानगी देण्याच्या ठरावाला मी विरोध केला होता. परंतु, सदर ठराव मंजूर झाला. या निर्णयाबाबत माझा विरोध आहे. – संतोष नांगरे, पदाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती
बाजार समितीने शेतकरी व व्यापारी हिताची कामे करणे अपेक्षित आहे. मात्र, नवनिर्वाचित कमिटी आल्यापासून व्यापाऱ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. सदर नवीन कमिटी बरखास्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे. बाजार समितीने होलसेल फिश मार्केट व पोल्ट्री व्यवसाय सुरू केल्यास मी येथे आमरण उपोषणाला बसणार आहे. आमचा या प्रकाराला तिव्र विरोध आहे – प्रविण चोरबेले, माजी अध्यक्ष, पुणे मर्चंट चेंबर
विरोध कायम…
बाजार समितीची पार्कींग भागातील काही मोकळी जागा शेड बांधून व ओटे बांधून फिश मार्केट व पोल्ट्री व्यवसायासाठी देणार आहोत. फिश मार्केट शेती नियमात असल्याने पणन खात्याकडून परवानगी घेण्याची गरज नाही. बांधकाम करायचे असेल तर पणन खात्याकडून परवानगी घेण्याची गरज असते. – राजाराम धोंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती
- आमदार माधुरी मिसाळ मांडणार व्यापाऱ्यांची मागणी
- मार्केट यार्डातील जागा फिश मार्केटला देण्याबाबत बाजार समिती ठाम
- माजी नगरसेवक प्रवीण चोरबेले आमरण उपोषण करणार