नगर – रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर सीनानदीवरील लोखंडी पुलाशेजारील नवीन पुलाच्या जोडरस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे. ते तातडीने आणि चांगल्या दर्जाचे करून 15 डिसेंबर पर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करावा अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रभाग क्र. 15 मधील नगरसेवकांनी दिला आहे. यावेळी नगरसेवक अनिल शिंदे, प्रशांत गायकवाड, दीपक खैरे, बबलु शिंदे यांनी महापालिकेचे उपायुक्त प्रदीप पठारे यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, सीनानदीवरील नवीन पुलाचे काम पूर्ण झाले असून, या पुलाला दोन्ही बाजूने जोडणाऱ्या जोडरस्त्याची कामे सध्या रखडलेली आहेत. 2 महिन्यांपूर्वी जोडरस्त्याचे काम सुरु केले होते मात्र, ते अतिशय निकृष्ट दर्जाची करण्यात आली. आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपायुक्त प्रदीप पठारे, अतिक्रमण विभागाचे सुरेश इथापे, अभियंता श्रीकांत निंबाळकर आदींनी या ठिकाणी जावून पाहणी केली. यावेळी जोडरस्त्यांचे काम दर्जेदार व्हावे, शेजारी असलेल्या स्मशानभुमीकडे जाण्यासाठी रस्ता करुन द्यावा, दोन वर्षांपासून पुलाजवळच असलेल्या विद्युत रोहित्राचे स्थलांतर करावी अशी मागणी करण्यात आली होती.
मात्र, गेल्या 2 महिन्यात याबाबत काहीही कार्यवाही झाली नसल्याने ही कामे अद्यापही ठप्पच आहे. रेल्वे प्रवाशांची वरदळ मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने करावे अन्यथा आंदोलन करण्यात येइल असा इशारा नगरसेवकांनी दिला आहे.