महापालिकेस केवळ जागेचे शुल्क देण्याचा मेट्रोकडून घाट
व्यावसायिक जागेतून मिळणाऱ्या उत्पन्नातील हिस्सा नाही
मेट्रो व्यावसायिक मिळकती उभारणार
पुणे – पुणे मेट्रोच्या आराखड्यात प्रस्तावित नसलेल्या जागा महापालिकेकडून घेऊन त्या ठिकाणी महामेट्रोकडून व्यापारी संकूल उभारण्यात येणार आहे. तसेच, या संकुलाच्या उत्पनाचा निधी मेट्रोच वापरणार आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार असल्याने ज्या ठिकाणी मेट्रोकडून व्यावसायिक मिळकती उभारल्या जाणार आहेत, त्याचा मोबदला महापालिकेकडून मागण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून अशा देण्यात आलेल्या जागा, मेट्रोकडून त्याचा करण्यात येणारा प्रस्तावित वापर याची माहिती संकलीत करण्यात येत असून त्यानुसार, मेट्रोला हा प्रस्ताव दिला जाणार आहे.
महापालिकेकडून मेट्रो प्रकल्पाच्या आराखड्यात मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या प्रस्तावित खर्चानुसार, मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांच्या कामासाठी आवश्यक असलेल्या जागांचे भूसंपादनाचा खर्च दोन्ही महापालिकांनी करायचा आहे. त्यानुसार, पुणे महापालिकेकडून मेट्रोला आराखड्यात प्रस्तावित असलेल्या जागा हस्तांतरित केल्या आहेत.
मात्र, त्या व्यतिरिक्तही आराखड्यात नसलेल्या जागांचीही मागणी मेट्रोने केली आहे. त्यात स्वारगेट येथील ट्रान्सपोर्ट हबच्या जागेसह इतर जागांचा समावेश आहे. या जागांवर मेट्रोस्थानकासह व्यावसायिक इमारती उभारण्यासाठी येणारा खर्च मेट्रो करणार असली तरी, त्याचे उत्पन्न व्यावसायिक दराने महामेट्रो घेणार आहे. त्यामुळे पालिकेस केवळ जागा देण्याचे शुल्क मिळणार आहे. पालिकेस व्यावसायिक जागेमुळे मिळणाऱ्या उत्पन्नातील काहीच हिस्सा मिळणार नाही. दोन दिवसांपूर्वी महापालिकेत झालेल्या बैठकीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. त्यानुसार, पालिकेकडून या जागांची माहिती तसेच महापालिकेच्या आर्थिक नुकसान निश्चित करून महामेट्रोला त्याबाबत कळविण्यात येणार असल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून सांगण्यात आले.
पुढील जागा देण्यास नकार
महामेट्रोकडून महापालिकेकडे आराखड्यात नसलेल्या आणखी काही जागांची मागणी महापालिकेकडे केली आहे. मात्र, पालिका प्रशासनाकडून त्यास तूर्तास नकार दिला आहे. जोपर्यंत व्यावसायिक जागांमध्ये महापालिकेचा हिस्सा काय असेल, पालिकेस उत्पन्न दिले जाईल का, याबाबत निर्णय होत नाही. तसेच, मेट्रोकडून पालिकेच्या जागांचे योग्य पद्धतीने मूल्यांकन केले जात नाही तोपर्यंत या जागा देण्यास नकार देण्यात आला आहे.