नवी दिल्ली – भारतात पत्रकारितेला पूर्ण स्वातंत्र्य आहे. देशातील पत्रकारांच्या स्वातंत्र्याबद्दल दुय्यम प्रतिमा निर्माण करणाऱ्या सर्वेक्षणाचा भांडाफोड करण्यात येईल, असे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. लोकांना माहिती देण्याचे आणि मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य माध्यमांमध्ये आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रकाश जावडेकर एका कार्यक्रमात बोलत होते. जावडेकर म्हणाले,
आम्ही देशातील पत्रकारांच्या स्वातंत्र्याबद्दल वाईट प्रतिमा दर्शविण्याचा प्रयत्न केलेल्या सर्वेक्षणांचा लवकरच खुलासा करू, असे ट्विट त्यांनी केले आहे. ग्लोबल प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारत दोन स्थानांनी घसरला आहे. स्वतंत्र पत्रकारितेची बाजू मांडणाऱ्या रिपोर्टर विथ बॉर्डर या संस्थेने यंदा जाहीर केलेल्या वार्षिक विश्लेषणामध्ये 180 देशांपैकी भारत 142 व्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले की, प्रेस हा भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. जनजागृती करून राष्ट्र उभारणीत पत्रकारांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, जागतिक प्रेस स्वातंत्र्यदिनी करोना विषाणूबद्दल जीव धोक्यात घालून जनजागृती करणाऱ्या आमच्या माध्यमांना मी सलाम करतो.
कॉंग्रेसचा भाजपला टोला
जगातील पत्रकारितेच्या दिवशी कॉंग्रेसने भाजपवर आरोप केला आहे. भाजप पत्रकारितेची गळचेपी करत असुन, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ नष्ट करण्याचा भाजपचा हेतू असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर म्हटले आहे की, वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारत दोन स्थानांनी घसरून 142 व्या स्थानावर गेला आहे. जेव्हा आपण जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन साजरा करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की लोकशाहीचा हा चौथा स्तंभ नष्ट करण्याचा भाजपचा हेतू आहे. आपण असे होऊ देऊ नये. तसेच सर्व पत्रकारांनी घाबरू नये, असे ट्विटमध्ये म्हटल आहे.