करोना हॉटस्पॉटच्या दिशेने कदमवाकवस्तीची वाटचाल?

दोघे बाधित : 15 जणांना पुण्याला हलविले

लोणी काळभोर (वार्ताहर) – कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील महिलेचा करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर तिच्या संपर्कातील 25 पैकी 2 नातेवाइकांच्या करोना चाचणीचा अहवाल शनिवारी (दि. 2) रात्री पॉझिटिव्ह आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी (दि. 3) त्यांच्या संपर्कातील आणखी 15 जणांना करोना चाचणी करण्यासाठी पुण्यातील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील तीन रुग्ण एकाचवेळी करोनाबाधित असल्याचे आढळून आल्याने भविष्यकाळात कदमवाकवस्ती गाव करोनाचे हॉटस्पॉट बनते की काय अशी भिती निर्माण झाली आहे.

कदमवाकवस्ती येथील खासगी रुग्णालयात 15 दिवसांप्पूवी उरुळी कांचन येथील एक महिला व तिच्यावर उपचार करणारे रुग्णालयातील एका डॉक्टरसह दोन नर्स असे चार जण करोना बाधित असल्याचे आढळून आले होते. या चौघांचा क्वारंटाइन कालावधी संपण्याच्या मार्गावर असतानाच, हडपसर येथील खासगी रुग्णालयात कदमवाकवस्ती येथील 70 वर्षीय महिला उपचार सुरू असताना तीन दिवसांपूर्वी तिचा मृत्यू झाला असून ती करोनाबाधित असल्याचे आढळून आले. महिलेचे मृत्यू करोनामुळे झाल्याचे निष्पन्न होताच, आरोग्य विभागाने महिलेच्या संपर्कात आलेल्या 25 नातेवाइकांची पहिल्या टप्प्यात करोना चाचणी करुन घेतली. यात 25 पैकी 2 जण करोना बाधित असल्याचे उघड होताच, आरोग्य विभागाने रविवारी दुपारी संबंधित महिलेच्या संपर्कात आलेल्या आणखी 15 जणांना चाचणीसाठी पुण्यातील शासकीय रुग्णालयात हलविले आहे. या 15 जणांचा करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह यावा यासाठी प्रार्थना करीत आहेत.

कदमवाकवस्ती येथील करोना बाधित महिलेचा मृत्यू होण्यापूर्वी तीची प्रकृती बिघडली असताना 25 नातेवाइकांबरोबर आणखी 15 नातेवाईक संबंधित महिलेच्या संपर्कात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या 15 जणांचीही करोना चाचणी करण्यात येणार आहे. करोना चाचणी झाल्यानंतर या सर्वांना संबंधितांच्या राहत्या घरी क्वारंटाइन करण्यात येणार आहे. करोनाबाधित महिला आजारी असताना, महिलेच्या संपर्कात आनखी कोणी आले होते का याचीही चौकशी सध्या सुरू आहे.

– डॉ. डी. जे. जाधव,आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, लोणी काळभोर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.