पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- सैन्य दलातील नोकरीच्या आमिषाने एकाला १२ लाख ३१ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लष्कर पोलिसानी राहुल ऊऊर्फ दिगंबर हिरामण माहिते, मोहित पवनकुमार सेवक, राजकुमार सारसार या तिघांच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तेरुनिसा बाबु शेख (६० ,रा. पाटील इस्टेट शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख यांचा नातु बिलाल याला आर्मीमध्ये नोकरी लावतो असे तिघांनी सांगत विश्वास संपादन केला. तसेच बिलाल याच्यावर असलेली फौजदारी केस निल करतो असे खोटे आश्वासन देऊन शेख यांचे सासरे व पती यांच्या नोकरीची प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम मिळवून देतो असे सांगून वेळोवेळी १२ लाख ३१ हजार रुपये उकळले. हा प्रकार २०२० ते २०२१ या दरम्यान घडला.
शेख यांचा विश्वास संपादन करण्यासाठी खोटा बनावट बँकेचा डीडी पाठवून, तसेच विमानाचे बनावट तिकीट पाठवून हे पैसे उकळण्यात आले. यानंतर कोणतेच काम होत नसल्याचे लक्षात येताच, तेरुनिसा शेख यांनी आरोपींकडे पैसे परत मागितले. त्या वेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दांगडे करत आहेत.