पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सीबीएसई संचालकाचे राजमुद्रा असलेले बनावट पत्र देऊन तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ट्रेनिंग आणि स्कील डेव्हलपमेंट सेंटरचे टेंडर पास करुन देण्याचे आश्वासन देऊन ही रक्कम उकळण्यात आली.
याप्रकरणी चंद्रा प्रदीप बॅनर्जी (४७,रा. बाणेर ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार प्रफुल्ल पाटील (४५, रा. मोशी), राजेंद्र शर्मा आणि राकेश शर्मा (दोघे रा. दिल्ली) यांच्यावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आणि आरोपी एकाच कंपनीत काम करतात. यातील आरोपींनी सीबीएसईच्या संचालकांशी ओळख असल्याचे भासवले. अभ्यासक्रम बदलल्यावर शिक्षकांसाठी ट्रेनिंग आणि स्क्रील डेव्हलपमेंटचे टेंडर निघते. ते मंजूर करुन देण्याचे आमिष दाखवले.
यासाठी वेळोवेळी रोख ४६ लाख आणि ऑनलाइन पद्धतीने चार लाखांची रक्कम घेण्यात आली. त्या बदल्यात राजमुद्रेचे लेटरहेड त्यावर डॉ. बिस्वजीत सहा यांची डिजिटल सही असलेले पत्र आणि सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनचे शिक्का असलेले टेंडर, ११ जिल्ह्यांतील शाळांच्या नावांची यादी पाठवून दिली. मात्र, हे सर्व बनावट असल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे करत आहेत.