माहिती सेवा समितीकडून तक्रार ; कारवाईची मागणी
वाघोली- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या फोनवर कॉल करून गोपनीय सर्व्हे करीत असल्याचे सांगून इच्छुक उमेदवारांची नावे घेऊन संबंधित क्रमांक दाबण्यास सांगणारा फोन कॉल आचारसंहितेचा भंग करणारा आहे. त्यामुळे माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी निवडणूक विभाग व लोणीकंद पोलिसांकडे लेखी तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.
शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी गोपनीय सर्व्हे करण्यात येत आहे. आपली पसंती संबंधित उमेदवार असतील तर ठराविक आकडा दाबा कृपया “आपले बहुमूल्य मत नोंदवा’ असा फोन कॉल +911725247703 या क्रमांकावरून शिरूर हवेलीतील बहुतांश नागरिकांना आला आहे. हा फोन कॉल आचारसंहितेचा भंग करणारा असल्याने वारघडे यांनी निवडणूक आचारसंहिता विभाग व लोणीकंद पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. याबाबत संबंधितांची चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.