एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन उपक्रमांतर्गत सर्वेक्षण : मोबाइल ऍप्लिकेशन, सॉफ्टवेअर तयार
पुणे – एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील साथीच्या आजारांची एकत्रीत माहिती घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यस्तरावर मोबाइल ऍप्लिकेशन आणि सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून आरोग्य कर्मचारी गावोगावी घरी जाऊन आजारांची माहिती घेऊन या ऍप्लिकेशनवर माहिती अपलोड करणार आहेत. त्याद्वारे रोगांचे मॉनिटरींग होणार आहे. जिल्ह्यात या संदर्भात आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रक्षिण देण्यास सुरुवात झाली असून 8 तालुक्यांत हे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.
वातावरणातील बदलांमुळे दरवर्षी साथीचे आजार पसरत असतात. अचानक आलेल्या आजारामुळे उपाययोजना करण्यास मर्यादा येतात. त्यामुळे केंद्र सरकातर्फे एकात्मिक आरोग्य माहिती व्यवस्थापन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याद्वारे आरोग्य विभागाच्या विविध सॉफ्टवेअर एकत्रीत करण्यात येणार आहेत. सध्या राज्यात हा उपक्रम राबविण्यात येत असून पुणे जिल्ह्यातही याचे काम सुरू आहे. तालुका आणि जिल्हास्तरावरील ही सर्व माहिती राज्य आणि केंद्रस्तरावर पाठविण्यात येणार आहे. त्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार म्हणाले, या ऍप्लिकेशनबाबत जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 8 तालुक्यांत प्रशिक्षण पूर्ण केले आहे. 1 तारखेपासून जिल्ह्यातील 96 आरोग्य केंद्र अणि 539 उपकेंद्रांद्वारे हे सर्वेक्षण गावोगावी होणार आहे.
देशात 7 राज्यांत उपक्रम सुरू
एकात्मित आरोग्य सर्वेक्षण उपक्रम देशात 7 राज्यांत सुरू केला आहे. याद्वारे साथीच्या आजारांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. भविष्यात संपूर्ण देशात हा उपक्रम लागू केला जाणार आहे. दरम्यान, उपक्रेंद्रस्तरावर 1 मोबाइल आणि टॅबलेटद्वारे आरोग्य सेविका, सेवक तसेच आशा सेविकांमार्फत हे सर्वेक्षण गावोगावी राबविण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन माहिती घेऊन मोबाइलद्वारे एकात्मिक आरोग्य माहिती व्यवस्थापन उपक्रम ऍप्लिकेशनवर ही माहिती अपलोड करण्यात येणार आहे. तसेच जीओ टॅगिंगही करण्यात येणार आहे. दिवसाला 100 घरे असे सर्वेक्षणाचे उद्दीष्ट असून महिन्यातून दोनदा सर्वेक्षण करण्याचे नियोजन आहे. या सर्वेक्षणाचा ट्रेंन्ड समजून भविष्यात येणाऱ्या आजारांवर उपाययोजना करण्यात येणार आहेत.