पुणे – पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेकडून यंदा रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली असली, तरी गतवर्षीच्या तुलनेत पुणेकरांना यंदा खड्डेमुक्तीचा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. महापालिकेने यंदा वर्षभरात वर्षात केवळ 230 किलोमीटर रस्ते खोदाईस परवानगी दिली आहे. यात शासकीय तसेच खासगी केबल कंपन्यांच्या खोदाईचा समावेश आहे.
सल 2021-22 मध्ये महापालिकेने तब्बल 620 किलोमीटरच्या खोदाईस मान्यता दिलेली होती. पावसाळ्यातही विविध कामांसाठी आणि कंपन्यांकडून ही खोदाई सुरूच राहिल्याने रस्त्यांची चाळण झाल्याने पुणेकरांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागला होता. मात्र, यंदा खोदाईचे प्रमाण कमी असल्याने खड्डे पडण्याचे प्रमाणही कमी राहिल, असा दावा महापालिकेच्या पथ विभागाने केला आहे. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी शहरातील खड्डे दुरूस्त करण्याचे काम वेगात सुरू असून 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर, उर्वरित कामे 10 जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे पथ विभागाचे
प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
…तब्बल 620 किलोमीटरची खोदाई
शहरात समान पाणीपुरवठा योजना, महावितरण तसेच खासगी मोबाइल कंपन्यांना खोदाईसाठी परवानगी दिली जाते. दरवर्षी सरासरी 300 ते 350 किलोमीटर खोदाईपर्यंतच परवानगी दिली जाते. मात्र, मार्च 2020 पासून लॉकडाऊनमुळे खोदाई परवानगीसह समान पाणीपुरवठा योजनेचे कामही बंद होते. लॉकडाऊन संपताच महापालिकेने खोदाईस सर्रास परवानग्या दिल्या. परिणामी 2021-22 मध्ये जवळपास ही खोदाई 620 किलोमीटरची झाली. नंतर हे रस्ते दुरुस्त करताना पालिकेची दमछाक झालीच; पण जवळपास 200 पेक्षा अधिक किलोमीटरचे रस्ते पावसाळा सुरू झाल्याने दुरूस्त करण्याचे राहून गेले. परिणामी, सर्व प्रमुख रस्त्यांवर खोदाईनंतर दुरूस्ती न झाल्याने पुणेकरांना खड्ड्यांचा सामना करावा लागला.
यंदा रस्त्यांवर विक्रमी खर्च
मागील पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था झाल्याने प्रशासनास टीकेचा सामना करावा लागला. त्यानंतर, पालिकेने तब्बल 450 किलोमीटरच्या रस्ते दुरुस्तीसाठी 320 कोटी रुपयांच्या कामाला सुरुवातही केली आहे. तर जी-20 परिषदेसाठीही पुन्हा रस्त्यांची कामे केली जाणार असून, पथ विभागास तब्बल 150 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. क्षेत्रीय कार्यालय, मुख्य खात्याकडूनही रस्ते दुरुस्ती सुरू असून त्यासाठीही 50 कोटींचा खर्च केला जाणार आहे. त्यामुळे यंदा रस्त्यांसाठी जवळपास 600 कोटींचा खर्च केला जाणार आहे.
पालिका प्रशासनाने शहर-उपनगरांत यंदा केवळ
230 किलोमीटरच्या रस्ते खोदाईस परवानगी दिली आहे. हे काम पूर्ण होताच नागरिकांचा त्रास कमी होण्यासाठी तातडीने रस्ते दुरुस्ती पूर्ण केली जात आहे. दरम्यान, येत्या काळात ज्या भागात खड्डे पडण्याची शक्यता आहे, तिथे पॅचवर्कही करण्यात आले आहे. साधारणपणे 10 जूनपर्यंत ही कामे पूर्ण होतील. त्याप्रमाणे नियोजनही करण्यात आले आहे. क्षेत्रीय कार्यालयांनाही तशा सूचना देण्यात आल्या आहेत.
– व्ही. जी कुलकर्णी, पथ विभाग प्रमुख, मनपा