नगर – शहरातील मकुंदनगर परिसरातील फकिरवाडा येथे संदल-उरूस मिरवणुकीत औरंगजेबचे फोटो झळकवल्याप्रकरणी चार जणांवर भिंगार येथील कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणाचे पडसाद राज्यात उमटले होते.
मोहंमद सर्फराज इब्राहिम सय्यद उर्फ सर्फराज जहागिरदार (रा. दर्गादायरा), अफनान अदिल शेख उर्फ खडा (रा. वाबळे कॉलनी), शेख सरवर (रा. झेंडीगेट), जावेद शेख उर्फ गब्बर (रा. आशा टॉकीज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार सचिन धोंडे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
फकिरवाड्यात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सदर तरुणांनी औरंगजेबचा फोटो झळकवला. तसेच आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्याने दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल, असे कृत्य केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. रविवारी रात्री ही घटना घडली. पोलिस उपनिरीक्षक किरण साळुंके अधिक तपास करीत आहेत. ही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी या घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षकांना कारवाईचे आदेश दिले होते.