Salary Increments 2024: भारतातील कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात या वर्षी सरासरी 10% वाढ करू शकतात. एका सर्वेक्षणानुसार, ऑटोमोबाईल, उत्पादन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारात सर्वाधिक वाढ अपेक्षित आहे. कंसल्टन्सी फर्म मर्सरने 27 फेब्रुवारी रोजी एकूण मोबदला सर्वेक्षण (TRS) जारी केले. त्यानुसार गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये सरासरी पगारवाढ 9.5 टक्के होती. मात्र यावर्षी 10 टक्के वाढ होण्यास स्थिती अनुकुल आहे.
सर्वेक्षणात म्हटले आहे की, भारताची अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत आहे आणि नवकल्पना आणि प्रतिभेसाठी अधिक आकर्षक होत आहे. ऑटोमोबाईल (automobile), उत्पादन (manufacturing), अभियांत्रिकी (engineering) आणि जीवन विज्ञान क्षेत्रातील (life sciences sectors) कर्मचाऱ्यांच्या पगारात भारतात सर्वाधिक वाढ होण्याची अपेक्षा आहे. हे सर्वेक्षण मे ते ऑगस्ट 2023 दरम्यान करण्यात आले होते आणि त्यात 1,474 कंपन्या, 6000 हून अधिक नोकऱ्या आणि 21 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
सर्वेक्षणात विविध उद्योगांमधील पगाराच्या ट्रेंडवर लक्ष केंद्रित करण्यात आले. सर्वेक्षणानुसार, पगारवाढीसाठी वैयक्तिक कामगिरी, कंपनीची कामगिरी आणि वेतन श्रेणी हे महत्त्वाचे घटक आहेत. यावर्षी भारतातील पगारात सरासरी 10% वाढ होऊ शकते. 2021 मध्ये भारतातील स्वेच्छेने नोकरी सोडण्याचे प्रमाण 12.1 टक्के होते, जे 2022 मध्ये 13.5 टक्क्यांवर पोहोचल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.