नवी दिल्ली -सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ए.एम.खानविलकर यांची मंगळवारी लोकपाल यंत्रणेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे त्या भ्रष्टाचारविरोधी यंत्रणेला जवळपास दोन वर्षांच्या खंडानंतर पूर्णवेळ प्रमुख मिळाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकपालचे प्रमुख आणि इतर सदस्यांची नियुक्ती केली.
लिंगाप्पा नारायण स्वामी, संजय यादव आणि रितुराज अवस्थी यांची लोकपालच्या न्यायिक सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. तर, सुशील चंद्रा, पंकज कुमार आणि अजय तिर्की त्या यंत्रणेचे बिगरन्यायिक सदस्य असतील. प्रमुख वगळता लोकपाल यंत्रणेत ८ सदस्य असू शकतात. त्यातील निम्मे न्यायिक आणि उर्वरित बिगरन्यायिक सदस्य असतात.
पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील निवड समितीकडून शिफारस आल्यानंतर राष्ट्रपती लोकपालमधील नियुक्त्या करतात. त्या यंत्रणेचे याआधीचे प्रमुख असणाऱ्या माजी न्यायाधीश पिनाकीचंद्र घोष यांचा कार्यकाळ २७ मे २०२२ यादिवशी समाप्त झाला.
तेव्हापासून लोकपालला नियमित प्रमुख नव्हते. माजी न्यायाधीश प्रदीपकुमार मोहंती यांच्याकडे प्रभारी प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.