सातारा – क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयाच्या स्वच्छता कामगारांना ड्रेनेजची स्वच्छता करताना टॉयलेटमध्ये दोन मानवी भ्रुण मृतावस्थतेत सापडल्याच्या अतिसंवेदनशनील बाबीची सविस्तर चौकशी होणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तात्काळ चौकशी समितीची नियुक्ती केली असून 14 ऑगस्टपूर्वी चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या चौकशी समितीमध्ये जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये, महिला व बालविकास अधिकारी मनोज ससे, क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयाच्या विधी अधिकारी पूनम साळुंखे यांचा समावेश आहे.
जिल्हा रुग्णालयात मृत भ्रूण सापडल्याने प्रशासन हादरून गेले आहे. या प्रकाराच्या चौकशीसाठी चार सदस्यांची समिती नियुक्त केली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.सातारा जिल्हा रुग्णालयात ड्रेनेजची स्वच्छता करताना टॉयलेटमध्ये स्वच्छता कामगारांना दोन मानवी भ्रूण मृतावस्थेत सापडले. भ्रूण हत्या रोखण्याचे काम ज्या विभागातून व्हायला हवे त्याच सिव्हीलमध्ये हा प्रकार आढळल्याने जिल्हा हादरला आहे. या संतापजनक प्रकारामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांच्या कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे.
सिव्हीलच्या वॉर्ड क्र. 5 मध्ये रविवारी स्वच्छतागृहाचे ड्रेनेज चोकअप झाले. स्वच्छता कामगारांनी ड्रेनेजची पाहणी केली. वरील बाजूस एक वस्तू दिसत असल्याने हॅन्डग्लोव्हज घालून व तोंडाला मास्क बांधून ते बाहेर काढले. वस्तू बाहेर काढताना त्याचा व्हिडीओ बनवला गेला आहे. तो व्हिडिओ सुमारे 49 सेकंदाचा आहे. व्हिडिओमधील दृश्य थरकाप उडवून देणारी व संतापाची लाट निर्माण करणारी आहेत. सापडलेल्या भ्रूणामध्ये एक भ्रूण पूर्ण तयार झालेले तर दुसरे भ्रूण सडलेल्या अवस्थेत आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना समोर आली. सातारा तालुक्यातील एक गर्भवती महिला आकस्मिक रक्तस्त्रावाच्या समस्येमुळे जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती.
ही महिला शौचालयात गेली असता अचानक झालेल्या त्रासाने पोटातील गर्भ निसटून तो शौचालयाच्या नलिकेत पडला. या महिलेने घाबरून याची कल्पना नर्सला दिली. घटनेचे गांभीर्य पाहून सफाई कामगारांनी मृत गर्भ व त्याची नाळं काढून स्वच्छ करून नातेवाईकांना देण्यात आला आहे. रुग्णालयात होणाऱ्या सर्व गर्भपातांची नोंद होत असते. वरिष्ठांच्या सूचनेनुसार चौकशी समिती नेमून त्याचा अहवाल तात्काळ पाठवला जाणार आहे, असे डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयाचा चुकीचा कारभार सातत्याने चव्हाट्यावर येत आहे. सिव्हिल हॉस्पिटलच्या ड्रेनेजमध्ये मानवी भ्रूण मृत आढळून आल्यामुळे संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
शल्य चिकित्सकांच्या कारभारावरही डॉक्टर्स, कर्मचारीही नाराज आहेत. त्यांच्या कार्यपध्दतीने जिल्ह्याचेही प्रचंड नुकसान होत असल्याच्या तक्रारी आहेत. करोनाबाधितांचे सर्वाधिक मृत्यू जिल्हा रुग्णालयात झाले आहेत. त्यातच जिल्हा रुग्णालयाच्या ड्रेनेजमध्ये सात महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेले मृत भ्रूण आढळले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेवून आरोग्य संचालनालयाने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
डॉ. गडीकर यांच्या बदलीची “आप”ने केली मागणी
“मानवी भ्रूण’ प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांची प्रशासकीय चौकशी करून त्यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगावकर यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.