पुणे – राज्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्यात आल्या आहेत. त्या संगणकीय बदली प्रक्रियेचा अभ्यास करून त्यात काही सुधारणा करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय अभ्यासगटांची समिती स्थापन केली आहे.
ऑनलाइन बदली प्रक्रियेच्या धोरणात काही बदल करण्याची गरज असल्यास त्याची शिफारस ही समिती करणार आहे. या संदर्भात राज्याच्या ग्रामविकास विभागाने परिपत्रक काढून निर्णय जारी केला आहे. ही समिती 5 जणांची आहे. त्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे समितीचे अध्यक्ष आहे. तर रायगडच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे हे सदस्य सचिव असणार आहेत, त्यामध्ये चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, तसेच उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांचा समावेश आहे.
या अभ्यासगटाने 10 फेब्रुवारीला प्रातिनिधिक स्वरूपात काही शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. तसेच काम करताना त्यांना बदल्या संदर्भात येणाऱ्या अनुभवांचा उपयोग करून प्रातिनिधिक शिक्षक संघटनांशी चर्चेतून मिळणाऱ्या माहितीचा अभ्यास करावा, असे ग्रामविकास विभागाने म्हटले आहे.